श्री लिंगेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Go to content

श्री लिंगेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री लिंगेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री लिंगेश्वर महादेव मंदिर.

स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा, क्रांतीकारक यांच्या स्मृती जपलेली बाग म्हणजे हुतात्मा गार्डन- बाग. याचबरोबर भुत, जादूटोणा,काळ, वेताळ अशा रंजक कथांनी भरलेली जागा म्हणजे हे बागेचे ठिकाण. अतिप्राचीन काळी या ठिकाणास द्वारका बेट म्हणूनही ओळखले जात होते. भगवान योगेश्वर श्रीकृष्णांना गर्गमुनींनी करवीरी जाण्यास सांगितले होते. कृष्णकृत हरीकुंड ही या ठिकाणी पहावयास मिळतो. "करवीर महात्म्य", "श्री करवीर यात्रानुक्रमः, श्री महालक्ष्मी प्रीत्येभवतुश्री", "करवीर महात्म्यस्यतीर्थदेवता" या प्राचीन ग्रंथामध्ये लिंगतीर्थ- लिंगेश्वर तसेच येथील स्थान महात्म्य वर्णन दिसून येते. या बागेच्या मधोमध वेताळ देवस्थान आहे. हे देवस्थान नेहमी उघड्यावर असते. यांना कोणी बंदिस्त करू शकत नाही. या प्रमाणे एका झाडाखाली दगडी चौथर्‍यावर शेंदूर लावलेले सहा दगड-गोटे स्वरूपात हे वेताळ देवस्थान आहे. येथे जिवंत सती गेलेल्या महिलांच्या ही स्मृर्ती शिळा आहेत. या वेताळ देवस्थानाच्या समोरच थोड्या अंतरावर सटवाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. हेमाडपंती शैलीतील जुन्या मंदिराचा दगडी कोरकीपणा, खांब,जुनेपणा तसाच ठेवत तीस बाय तीस दगडी एकपाकी पत्र्याचे शेड बांधणी करत सुंदर मंदिराची उभारणी केली आहे. येथेही शेंदूर लावलेले सहा दगड-गोटे स्वरूपात श्री सटवाई देवीचे स्थान आहे. जन्मजात बाळाचे भविष्य श्री सटवाई देवी लिहिते अशी भाविकांची श्रद्धा असलेमुळे नवजात शिशु बालकांना इथे आणण्याची जुनी प्रथा आहे. हे सटवाई चे मंदिर बागेच्या एका बाजूला तर बरोबर दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई फुले रुग्णालय- दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस जयंती आणि गोमती संगम स्थान आहे. येथील पुलाजवळील रस्त्यावर हुतात्मा पार्क बागेच्या प्रवेशद्वाराजवळून प्रवेश करतात बागेच्या आत मध्ये हे श्री लिंगेश्वर महादेव मंदिर आहे. प्राचीन हेमाडपंती शैलीतील बारा बाय बारा दगडी एक पाकी स्वरूपातील हे मंदिर आहे.मंदिराबाहेरील श्री नंदी मूर्तीस मंदिराला लागूनच दगडी भिंती, आर.सी.सी. छत, लोखंडी रेलिंग करत सुरक्षित नंदीमंडप उभारणी केली आहे. अतिप्राचीन काळात असलेले कौलारू स्वरूपाचे एकदम साधे मंदिर, विहीर यांच्या पाऊलखुणा आजही पहावयास येथे मिळतात. श्री विष्णू, गरुड, लक्ष्मी, नारद अशा मूर्ती ही येथे दिसून येतात. प्रामुख्याने श्री भगवान योगेश्वर मुरलीधर श्री गोपाळकृष्ण यांची गर्भगृहात असणारी सुंदर मूर्ती यामुळे हे लिंगेश्वर मंदिर श्री गोपाळकृष्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हुतात्मा पार्क गार्डन याआधी ही वेतांळाची जागा-बाग हीच ओळख होती. याच बरोबर भगवान योगेश्वर श्रीकृष्णांचे करवीर नगरीतील या ठिकाणी असणारे वास्तव्य यामुळे हे स्थान द्वारका बेट म्हणून ही प्रचलित आहे. भगवान योगेश्वरांचे लिंग रूपातील स्थान यास्तव हे लिंगेश्वर स्थान दक्षिण काशी क्षेत्र करवीर नामावली मध्ये तसेच द्वारका बेट- सद्यस्थितीतील हुतात्मा पार्क गार्डन येथे आढळून येते. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री लिंगेश्वर-महादेव मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.Back to content