Goddess Mahalaxmi or Ambabai as she is known locally - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content

म्हाळुंग एक दिव्य वनस्पती

Ambabai Mahalaxmi Kolhapur
Published by Mandar in Adam's Apple · 15 July 2021
Tags: Adam'sapple
म्हाळुंग एक दिव्य वनस्पती

भारतीय सांस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून विज्ञानाच्या अनेक शाखांची प्रगती झाली होती. सर्व जगाला मार्गदर्शक ठरेल अशी शास्त्रे भारतात शिकवली जात होती, आयुर्वेद या विद्याशाखेचा भारतीयांनी अतिशय सखोल अभ्यास केला होता. दुर्दैवाने अतिशय कष्टाने भारतीय विद्वानांनी संपादित केलेले हे ज्ञान विदेशात गेले. आपल्या ग्रंथातील संदर्भ म्हणजे कपोलकल्पित पुराणकथा आहेत ही समजूत दृढ करून परकियांनी त्या ज्ञानावर स्वत;च्या संशोधनाचे लेबल लावले. वास्तविक पाहता सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेक औषधांच्या रचनेचे मूळ भारतीय आयुर्वेद शास्त्रात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

मधूर मातुलुंगं तु शीतं रूचिकरं मधु । गुरु वृष्यं दुर्जर च स्वादिष्टं च त्रिदोषनुत ।।
पित्तं दाहं रक्तदिषान्विबंधश्‍वास्वकासकान । क्षयं हिक्कां नाशयेश्‍च पूर्वैरैवमुदाहूतम्‌ ।।

अर्थ- गोड म्हाळुंग हे शीतल, रुचिकारक, मधुर, भारी (जड), वीर्यवर्धक, दुर्जर, स्वादिष्ट, तसेच त्रिदोष, पित्त, दाह, रक्तसंबंधीत विकार, मलबंध, श्वासविकार, खोकला, क्षय आणि उचकी दूर करते.

म्हाळुंग हे अत्यंत गुणकारी फळ अशा दुर्लक्षित वैभवापैकीच एक आहे. या फळाची
विविध भाषांतली केवळ नांवे जरी पाहिली तरी या औषधी वनस्पतीच्या महत्वाची जाणीव होते. संस्कृतमध्ये याला 'मातुलुंग' म्हणतात. हिंदीत 'बीजफल' किंवा 'बीजौरा' या नावाने हे फळ परिचित आहे. सायट्रस मेडिका या पारिभाषिक नावाने परिचित अशा या फळाचे इंग्रजीतील अँडम्स अँपल हे नांव अतिशय समर्पक आहे. मानवी प्रजोत्पतीसाठी आदिकारण ठरलेल्या या वनस्पतीची महती ईस्लाम तसेच ख्रिश्‍चन व यहुदी या संस्कृतीने गौरवलेली आहे. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये पण आदिशक्ती किंवा जगत्‌ूजननी या स्वरूपाच्या देवीच्या हातामध्ये हे फळ देवीने धारण केले आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच आदिशक्ती. तिच्या उजव्या हातात हे फळ धारण केलेले असून धर्मशास्त्राप्रमाणे या फळाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर जैन मूर्तीशास्त्रात चोवीस तीर्थकरांचे चोवीस यक्ष आणि चोवीस यक्षिणींपैकी तीस मूर्तींच्या हातात हे फळ असल्याचे उल्लेख पहायला मिळतात. गणेश उपासनेत महागणपती या गणेशाच्या हातात पण म्हाळुंग आहे. तर आपल्या परंपरातील अनेक देव देवतामूर्ती म्हाळुंग धारण केलेल्या पहायला मिळतात. जगभरातील भिन्न भिन्न संस्कृतीमध्ये देवतामू्तीना हे फळ धारण केलेले दाखवले जाते. यामागे या वनस्पतीच्या महत्वाच्या औषधी गुणधर्माचे प्रतीक आहे.

आयुर्वेदाच्या अनेक प्राचीन तसेच अर्वाचीन ग्रंथात या वनस्पतीच्या विविध औषधी गुणधर्माचे वर्णन पहायला मिळते.
'बृहत्‌निघंटु रत्नाकर या ग्रंथमालिकेतील शालीग्राम निघंटु' या ग्रंथात म्हाळुंगाच्या विविध औषधी उपयोगाबाबत सविस्तर माहीती पहायला मिळते, तर महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील आयुर्वेद महामहोपाद्याय म्हणून गौरवल्या गेलेल्या शंकर दाजीशास्त्री पदे यांच्या 'वनौषधी गुणादर्श' या १८९३ साली रचलेल्या ग्रंथात म्हाळुंग हे फळ बावीस प्रकारच्या आजारावर औषधी म्हणून गुणकारी असल्याचे म्हटले आहे. यातील सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करून सुलभ प्रसूतीसाठी केला जाणारा उपयोग होय. याशिवाय वेदनाशामक म्हणून सुद्धा हे फळ गुणकारी
आहे. या फळाच्या मुळामध्ये व सालीमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. ही वनस्पती जगभर मिळत असली डर तरीही आपल्याकडे मात्र औषधी म्हणून तिचा वापर कमीच केला जातो, किंबहुना या फळाकडे श्री महालक्ष्मी ला अर्पण करण्याचे फळ म्हणून धार्मिक महत्वच जास्त दिले गेलेले पहावयास मळते. वात, पित्त आणि कफ या तीनही प्रवृत्तीचे संतुलन करणारे हे फळ असून गुजराथ आणि राजस्थानात याचे लोणचे आहारात वापरले जाते.

या वनस्पतीच्या अनेक औषधी गुणांचा अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे. यातून प्राचीन भारतीय आयुर्वेदाला ज्ञात असलेली अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होईल.

लेखक - उमाकांत राणिंगा.
मोबा - 9890144610.


Back to content