संगीतातील गौरीशंकर गायनमहर्षी अल्लादियाँखा साहेब

Go to content

संगीतातील गौरीशंकर गायनमहर्षी अल्लादियाँखा साहेब

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Sourabh Mujumdar in Cultural Kolhapur · Friday 12 Sep 2025
Tags: MusicschoolofKolhapur
कोल्हापूरची संगीत परंपरा तशी दोनशे  वर्षांपूर्वीची आहे.  परंतु या परंपरेला सर्वोच्च पदावर पोहोचवण्याचे श्रेय खाॅसाहेब आल्लादियाखाॅ यांनाच आणि त्यांच्या अंत्रोली घराण्यासच जाते. कोल्हापूरच्या जनतेचे जीवन समृद्ध होण्यासाठी आणि लोकांची सांस्कृतिक पातळी उंचावण्यासाठी संगीत, नाट्य, चित्र, शिल्प अशा विविध क्षेत्राचस महत्त्व द्यावयासच हवे. हे राजर्षी शाहू महाराजांनी बरोबर हेरले. माणसांची योग्य पारख करण्याच्या त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्यांनी अल्लादियाखाॅ साहेबां सारख्या नवरत्नाला राजाश्रय दिला.

विविध संदर्भीय माहितीनुसार  कोल्हापूर संस्थानच्या स्थापनेनंतर अठराव्या शतकामध्ये करवीर नगरी व आसपासच्या भागात मिळून सुमारे सहाशे कलाकार धृपद  ही पारंपारिक व भारदस्त गायकी गात होते. कोल्हापूरच्या प्राथमिक अवस्थेतील संगीतकारकिर्दीस कै. छत्रपती बुवासाहेब महाराज व छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्यापासून सुरुवात झाली.

त्याला त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले ते राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांनी.  कलेची कदर करणाऱ्या या राजाने संगीत केलेलाही अग्रक्रम दिला. दरबार गवई होण्याचा पहिला मान ग्वाल्हेर घराण्याच्या महादेव बुवा गोखल्यांना मिळाला. शास्त्रीय संगीतात प्रामुख्याने चार घराणी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, व किराणा ही महत्त्वपूर्ण मानली जातात. कोल्हापूरला या चारही घराण्याचा सहवास लाभला.

जयपुर जवळील उनियारा हे गाव खाॅसाहेबांचे जन्मस्थळ. १० ऑगस्ट १८५५ ला त्यांचा जन्म झाला. संगीतोपजीवी खानदानी घराण्यात जन्माला आलेले हे बालक पुढे कोल्हापूरच्या संगीत क्षेत्राचे ताईत बनले. बाबा हरिदास, नाथ विश्वंभर हे त्यांचे पूर्वज. जवळ जवळ पंधरा वर्षे वडिलांच्या तालमीत तयार झालेले खाॅसाहेब वडिलांच्या निधनानंतर चुलत काका जहागीर खाॅसाहेबांच्या तालमीत तयार झाले. नेपाळ, अजमेर, जोधपुर अशा अनेक संस्थानांचे ते दरबारी गायक होते.

विक्रमादित्य संमेलनात ८० वर्षे उलटलेले खाॅसाहेब गायकीला बसलेले होते. बिस्मिल्लाखाॅ, हाफिजखाॅ साहेब यांनी त्यांची मैफिल ऐकली. आवाजाचा जबरदस्त झोत, स्वर लगावची सच्चाई, लायकारीचा मनोहारी खेळ ,तानांची बरसात ही त्यांची गायनाची वैशिष्ट्ये अखेरपर्यंत त्यांच्या शरीरात होती.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे बंधू श्री बापूसाहेब कागलकर यांनी खाॅसाहेबांचे गायन पुण्यात ऐकले. त्यांना कोल्हापुरात आणण्यासाठी बापूसाहेबांनी राजर्षी शाहू महाराजांना त्यांचे गाणे ऐकण्याचा योग मुद्दाम मुंबईमध्ये घडवून आणला.  खाॅसाहेबांचे गाणे राजर्षी शाहूंना इतके मोहित करून गेले की,  त्यांनी त्यांना व त्यांचे बंधू हैदरखाॅ यांना दरबारी गायक म्हणून कोल्हापूर संस्थानामध्ये नेमले. खाॅसाहेब पैशाचा कधी हाव धरत नसत. प्रतिष्ठा व विद्या सांभाळणे याला ते प्रथम प्राधान्य देत असत.

श्री शाहू छत्रपतींनी आपल्या अंतःकालापर्यंत खाॅसाहेबांना आपुलकीने व आदराने वागविले त्यांच्या निवासासाठी वंशपरंपरागत मालकीचे घर, जमीन, बंधूना राजवाड्यातील कुलस्वामिनी समोर दरबारात गाण्याची नोकरी सर्वकाही दिले. खाॅसाहेबांसारखे अमूल्यरत्न आपल्या दरबारात आहे हे ते जाहीरपणे व आनंदाने सांगत असत. अल्लादियाखाॅसाहेबहि आपल्या राजाशी सदैव एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. चौपट मानधनाची आमिषे त्यांनी सहज झिडकारून लावलेली होती.

खाॅसाहेबांना जुना राजवाड्यातील कुलस्वामिनी समोर आठवड्यातून दोन वेळा, नवरात्रोत्सवात दोन-तीन दिवस जाहीररीत्या गायन सेवा करावी लागत असे. शिवाय पंत अमात्य श्री माधवराव बावडेकर यांच्या रामनवमीच्या सणालाही ते गगनबावडा संस्थानात गायन सेवा करण्यासाठी जात असत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही जगदंबेसमोर खाॅसाहेबांनी बरीच वर्षे गायन सेवा केलेली होती.

दोन्ही बंधूंचे राजस्थानी पद्धतीचे बांधलेले फेटे, धोतर नेसण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत, रुबाबदार गलमिशा, चेहऱ्यावरील विद्येचे तेज व आत्मविश्वास यांची सर्वोत्तम छाप करवीरकरांवर पडत असे. बिन, सतार, जलतरंग वगैरे वाद्यांवर त्यांचे विशेष प्राविण्य होते. अल्लादियाखाॅसाहेब कोल्हापूर संस्थानात इ.स. सन १८९५ च्या सुमारास म्हणजेच त्यांच्या वयाच्या ४५ व्या वर्षी आले. सुमारे ५० वर्षे पुढे ते अनभिषिक्त सम्राटा प्रमाणे येथे राहिले.

खाॅसाहेबांनी शिकवून तयार केलेल्या कै. तानीबाई व श्रीमती केसरबाई केरकर यांच्यासारख्या शिष्यांची तुलना करण्या इतक्या योग्यतेच्या गायिका अद्यापही आढळत नाहीत. खाॅसाहेबांचे बंधू हैदरखाॅ आणि पुत्र मंजीखाॅ आणि विशेषतः भुर्जीखाॅ व पुतणे नत्थनखाॅ यांनी अनेक शिष्य तयार केले आणि या भगीरथतुल्य अशा गायन सम्राटाने अभिजात संगीताची गंगा आपल्या कोल्हापूर शहराच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणली म्हणण्यास हरकत नाही.

१६ मार्च १९४६ रोजी या महान अवलियाचे निधन झाले.
- -

अल्लादियाँखा साहेबांचे स्मृती शिल्प :

२२ एप्रिल १९४९ ला अल्लादियाखाॅ साहेब यांचा लाखो करवीर वासियांमार्फत  अलोट प्रेमा खातीर देवल क्लब समोरील चौकात ब्रांझचा अर्ध पुतळा बसविण्यात आला. कोल्हापूरचा हा संगीतातील गौरीशंकर ठरलेला खाॅसाहेबांचा पुतळा कदाचित अजूनही फारच अल्प जणांना ठाऊक असेल.

- सौरभ मुजुमदार, कोल्हापूर.


Back to content