नवरसांमधील सुंदर शांतभावाची मिळते अनुभूती
समाजमन कणखर बनवणारा नवरात्रीतील दुर्गा उत्सव. भारताच्या विविध भागांत वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह मोठ्या उत्साहाने साजरा होतो. आपल्या येथील निडर सामर्थ्याच्या या उत्सवा प्रमाणेच बंगाल व गुजरातमध्ये त्या त्या प्रदेशातील शृंगार व वस्त्रवैभवाच्या वैशिष्ट्यांसह मूर्ती अलंकृत होते. उत्सवप्रिय समाजात सण-समारंभांच्या प्रसंगी उत्सवमूर्ती समोर विविध खाद्यपदार्थ, संगीत, आतषबाजी, चित्ररचना व रांगोळी सारख्या सजावटींत रंगांची योजना मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रत्येक आकार काहीतरी सांगतो, त्याचप्रमाणे प्रत्येक रंगालाही स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण भाव असतो. कोणत्याही एका रंगा सोबत येणारा दुसरा रंग त्या भावयोजनेत अधिक आशय जोडतो. हे संक्रमण उत्सवातील उत्साहाला पोषक ठरते. त्या त्या प्रदेशांतील पर्यावरणाला अनुसरून असलेल्या वस्त्र अलंकाराच्या परंपरेचा तपशील कलाकृतीला संपन्नता बहाल करतो.
काळानुरूप आशय नवनवीन स्वरूपात विकसित होत राहतो. उदाहरणार्थ लष्करी, विमान व नाविक दलातील आपल्या बहिणींनी सिंदूर युध्द मोहिमेत दाखवलेल्या अफाट कर्तृत्वामुळे त्या 'लष्करी वेशातील सद्यकालीन नवदुर्गा' म्हणून भारतीय समाजात सर्वोच्च आदराच्या ठरल्या आहेत.
नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामातेच्या कलाकृतीं मध्ये शृंगार, हास्य व करुणा जतन करताना दुष्ट राक्षसी शक्तींशी अपरिहार्य संघर्ष करत रुद्ररूपात वीरता धारण करून युद्ध जिंकताना भयानकतेला विलीन करणारा आणि नवरसांतील सुंदर शांतभाव यशस्वीपणे साकारलेला अनुभव आपण घेतो. नऊ दिवसांच्या प्रत्येक रूपामध्ये या देवतेची वस्त्रे, आयुधे आणि वाहन वेगवेगळे असतात. त्यामुळे चित्र-शिल्पकारांना कलाकृतीची कल्पना करताना नावीन्यपूर्ण संदर्भ उपलब्ध होतात. कलाकृती साकारण्यासाठी आवश्यक विविधतेची संपन्नता प्राप्त झाल्यामुळे हा सोहळा कलाकारां साठी एक आनंदोत्सव ठरतो.
-
प्रा. अजेय दळवी
कोल्हापूर.