श्री संगमेश्वर - श्री क्षेत्र अनुगामिनी

Go to content

श्री संगमेश्वर - श्री क्षेत्र अनुगामिनी

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री संगमेश्वर - श्री क्षेत्र अनुगामिनी, कमंडलू तीर्थ :- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री क्षेत्र अनुगामिनी, कमंडलू तीर्थ, संजीविनी आणि मयुरी नदीच्या संगम स्थानावरील श्री संगमेश्वर- महादेव मंदिर.

शहराचे वाढते शहरीकरण, नागरी लोकवस्तीच्या अतिक्रमणाचा विळखा यातून प्राचीन इतिहासाचा वारसा ही आठवणी, कागद- पुस्तकांपुरताच मर्यादित होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे हे संगमेश्‍वर मंदिर आहे. संजिविनी- मयुरी या कोल्हापूर नगरीच्या प्रमुख नद्यांपैकी नद्या होत्या हे आज सांगूनही पटणार नाही. या नद्यांचे ओढे नाल्यात रूपांतर, तर काही पात्र प्रवाहातच बदल याची उदाहरणे आहेत आणि आता तर लोकवस्तीचाच हा एक भाग बनल्यामुळे घनदाट झाडीतील, रान-शेतवटातील प्राचीन मंदिर ही ओळख पुसटशी होत चालली आहे. या क्षेत्राजवळ थोड्या अंतरावर दूधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला आहे. प्रति दिन सतरा दशलक्ष लिटर क्षमतेच्या या प्रकल्पात अनेक नाले येऊन मिसळतात. आज जरी हे नाले दिसत असले तरी प्राचीन काळातील अध्यात्मिक महत्व दर्शवणाऱ्या संजीवनी व मयुरी अशा नदी आहेत.

आजच्या काळात या नद्या जशा नष्टप्रद केल्या आहेत अगदी त्याचप्रमाणे या नद्यांचे संगम स्थान तसेच संगम काठावर असणारे श्री महादेव मंदिर ही मोडकळीस, उद्ध्वस्त अवस्थेमध्ये होते. यामुळे हे प्राचीन मंदिराचे दगड, अवशेष शेजारीच असणार्‍या श्री अनुगामिनी मंदिर परिसरात ठेवले आहेत. दगडी चबुतऱ्यावर चार बाय चार एकपाकी मंदिर एवढेच मंदिराचे स्वरूप होते. अगदी या ठिकाणावर अगदी जुने मंदिर जसे होते तशाच पद्धतीने अलीकडील काळात श्री गोविंदराव दत्ताजीराव गायकवाड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करत नव्याने मंदिर उभारणी केली आहे. या मंदिरापर्यंत लोकवस्ती अपार्टमेंट चे जाळे येऊन पोचले असले तरी या शेजारीच असणारे श्री अनुगामिनी देवीचे मंदिर मात्र शेतवट परिसर, मोठमोठे वृक्ष, हिरवीगार शेती अशा वातावरणातच दिसून येते. अगदी दहा वीस वर्षांपूर्वी रंकाळा, जावळाचा श्री गणेश मंदिर मार्गे दगड-धोंड्यातून, घनदाट जंगलातून शहरापासून दूर एका बाजूला एकाद्या गावाला गेल्या प्रमाणे वाट काढत जावे लागत असे.

ही श्री अनुकामिनी देवी म्हणजे कोल्हापूरची एक रक्षक देवता मानली जाते. करवीर क्षेत्र हे भक्ती मुक्ती प्रदायनी क्षेत्र आहे. यम देवतेपासून कोणतीही पिडा होऊ नये तसेच श्री महालक्ष्मीच्या आज्ञेवरून मुक्ती प्रदायनी रक्षक देवता मानली जाते. पाच फूट उंचीची सहा हातांची पायामध्ये असुर देवता महादेव असलेली भव्य मूर्ती इथे दिसून येते. बारा बारा बारा दगडी एकपाकी हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्राचीनतेची साक्ष देते. मोठ्या वटवृक्षाखाली भगव्या रंगाने रंगवलेली दोन विरगळ ही इथे दिसून येतात. श्री म्हसोबा, श्री महादेव तसेच स्मृती समाधी पादुका ही येथील परिसरात आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी परिवार देवता मधील ही देवी असल्यामुळे "करवीर महात्म्यस्थतीर्थ देवता" या प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील प्रमाणे वर्णन आढळते.

अनुगामिनी देवी जत्रै व तस्याःपुष्ठतः मयुरी।
पूरतः संजीवनी साऋष्यश्रंगाश्रमांतिके जातासती
उत्तरे शानूगामिन्यो मध्ये उत्तर वाहिनी।
तयोःउदक्कस्त संगमः॥
देवीच्या समोर यज्ञकुंड तसेच छोट्या स्वरूपात कमंडलू तीर्थ ही पहावयास मिळते. हे कमंडलू तीर्थ स्थान येथे रंकाळ्याहून येणारा पाण्याचा प्रवाह तसेच अन्य प्रवाह एकत्र येऊन दुधाळी मार्गे पंचगंगा या मुख्य नदीत मिसळत असे. आजच्या काळात या उपनद्यांचे स्थान अगदी नगण्य झाले आहे. असे असले तरी हा श्री अनुगामिनी देवी परिसर विलक्षण आनंददायी अध्यात्मिक प्रचिती देणारा आहे. असे हे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले शहराच्या पश्चिमेस रंकाळ्याच्या उत्तरेस थोड्या अंतरावर असणारे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री संगमेश्वर-महादेव मंदिर, श्री अनुगामिनी कमंडलु तीर्थक्षेत्र.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.

Facebook Link : https://www.facebook.com/udaysinh.rajeyadav.1


Back to content