'ब्रह्मपुरी टेकडी - प्राचीन कोल्हापूर
'ब्रह्मपुरी टेकडी - प्राचीन कोल्हापूर'
जुना बुधवार पासून पुढे आल्यानंतर तोरस्कर चौक लागतो, त्यानंतर पंचगंगा नदीच्या अलीकडे एक टेकडी लागते. ती टेकडी म्हणजे ब्रह्मपुरीची टेकडी! टेकडीच्या उजव्या बाजूला एक चर्च व बुऱ्हाणसाहेबाचा दर्गा. शहराचा सर्वात जुना किमान दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा हा परिसर. प्राचीन कोल्हापूर या टेकडीवर वसलेले पण काळाच्या ओघात ते जमिनीखाली गडप झाले. कोल्हापूरच्या ज्ञात इतिहासाचे मुख्यतः तीन कालखंड पडतात.
१) प्राचीन काळ: हा काळ अदमासे इ. सनाच्या नवव्या शतकापर्यंतचा मानावा लागेल. या काळात ब्रम्हपुरी टेकडीवर वसाहत होती आणि अंबाबाई मंदिराची स्थापना झालेली न्हवती.
२) मध्य काळ: या काळात अंबाबाई मंदिराची स्थापना झाली आणि मुख्य वस्ती याच परिसराभोवती निर्माण झाली.
३) अर्वाचीन काळ: इ. स. १८४४-४८ साली रेसिडेन्सीची स्थापना झाल्याबरोबर शहराच्या आधुनिक काळाला सुरवात झाली.
साधारणतः इ. सनाच्या नवव्या शतकामध्ये श्रीमहालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली. पूर्वी सहा लहान लहान खेडी अस्तित्वात होती. ही सहा केंद्रे म्हणजे १) ब्रह्मपुरी २) उत्तरेश्वर ३) खोल खंडोबा ४) रंकाळा ५) पन्हाळा आणि ६) रावणेश्वर. यातील ब्रम्हपुरी हे सर्वात जुने खेडे होते. त्याबद्दल पुष्कळ माहिती उपलब्ध आहे.
ब्रह्मपुरी : ज्या खेड्यांमधून आजच्या कोल्हापूरचा उगम झाला; त्यापैकी सर्वात जुने खेडे म्हणजे ब्रह्मपुरी होय! मानवी जीवनाच्या उत्क्रांतीच्या याच काळात ब्रम्हपुरी टेकडीवर वसाहत निर्माण झाली असेली पाहिजे. कारण बारमाही पाणी, शेती करता उत्तम जमीन, शिवाय वस्तीही उंचावर होती. इथे घरे बांधल्यावर पुरामध्ये बुडण्याचा धोका नाही. म्हणून कोल्हापूरचा उगम प्राचीन अशा ब्रह्मपुरी टेकडी वरील नैसर्गिक केंद्रावरून झाला असे म्हणता येईल.
'ब्रह्मपुरी' हे नाव का पडले याबाबत दोन मते सांगितली जातात. पहिले म्हणजे, या ठिकाणी ब्राह्मण वस्ती असल्याने 'ब्रह्मपुरी' नाव पडले असावे. दुसरे मत असे आहे की, हे खेडं कसे वसविले गेले याची माहिती नसल्याने ते ब्रह्मदेवाने निर्माण केले अशी आख्यायिका प्रसिद्ध झाली आणि ब्रह्मपुरी हे नाव प्रचलित झाले.*
(*कोल्हापूरचा एक शिलाहार राजा गंदरादित्य याच्या कारकिर्दीत शके १०४८, इ. स. ११२६-२७ च्या एका शिलालेखात कोल्हापूरचा महातीर्थ असा उल्लेख असून ब्रह्मपुरीत खेदित्याचे (सूर्याचे) देवालय असल्याचेही त्यात नमूद आहे. या शिलालेखात असे म्हटले आहे की, 'कोलापूर' किंवा 'ब्रह्मपुरी' ब्रह्माने निर्माण केली. याचा अर्थ असा की ब्रह्मपुरी वसाहत इतकी प्राचीन होती की ती स्वतः ब्रह्मदेवाने निर्माण केली असे त्याकाळी मानले जात असावे. - एच. डी. सांकलिया आणि एम. जी. दिक्षित : एक्सकेवेशन्स at ब्रह्मपुरी )
इ. स. १०६ - १३० च्या सुमारास सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी दक्षिणेत राज्य करीत असतां या टेकडीवर विटांच्या घरांनी बनलेले सुंदर असे खेडे होते. या प्रदेशात शातवाहन, कुर, चुटु व महारथी अशी राजघराणी त्या काळात होती. सांस्कृतिक व्यापाराच्या दृष्टीने या गावाचा रोमन राज्यांशी व्यापारी संबंध होता. तिकडून आलेल्या ब्रॉंझ धातूचे मातीमध्ये केलेले अनुकरण उत्खननाच्या वेळी मिळाले आहे. हे गाव बहुदा श्रीयज्ञशातकर्णी याच्या कारकिर्दीत आगीनें उध्वस्त झाले. यानंतर कोल्हापूरची पुढील वाढ महालक्ष्मी मंदिरा सभोवताली होत गेली. इ. स. १९४५ - ४६ साली झालेल्या ब्रम्हपुरी टेकडीवर केलेल्या उत्खननामुळे प्राचीन बरेच अवशेष मिळाले. ते अवशेष आजही कोल्हापूरात टॉउन हॉल या ठिकाणी संग्रही आहेत.
इ. सनाच्या १५व्या शतकाच्या आसपास ब्रह्मपुरीवर मुसलमानी राज्य आले. इथे थोडी मुसलमानी वस्तीही झाली. लष्करी मोहिमांसाठी नदीच्या काठावर मुस्लिम वस्ती झाली असावी असे वाटते. याच काळी इथे दर्गा बांधला असावा. तोच दर्गा (अथवा दुसरा) अद्यापही आहे. असे म्हणतात की, इ. स. १७०१ च्या सुमारास औरंगजेब पन्हाळ्यास जात असता याच टेकडीवर मुक्काम केला होता. त्यानंतर २०व्या शतकात ब्रिटिश अंमल असताना काही जागा ख्रिश्चन लोकांना द्यावी लागली आणि इथे चर्च सुद्धा बांधण्यात आले!
इथल्या भूकंपाने अथवा आगीनें गाडला गेलेला इतिहास आजही डोकावून वर पाहतो आहे. बावड्याजवळ राजाराम बंधारा बांधला गेल्याने, नदीवर पूल देखील बांधण्यात आला. त्यानंतर घाटाजवळील काही सुंदर मंदिरे पाण्याखाली गेली. आता या जागेचे स्वरूपच पालटले आहे. इथे सूर्यास्ता वेळी जावे. नयनरम्य दृश्य असते. प्राचीन गाव अनुभवण्यासाठी इतिहासकालीन दृष्टी ठेवून, इथून वावरावे लागते, तरंच इतिहास उमजतो. इतिहास खूप काही शिकवून जातो.
©वैभव गुरव.
संपर्क क्रमांक : 8830845767
Email : vaibhavrg26@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/vaibhav.gurav.1276