आदिशक्ती जगत्जननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी

Go to content

आदिशक्ती जगत्जननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Sourabh Mujumdar in Mahalaxmi Ambabai temple premises · Thursday 25 Sep 2025
Tags: ShriYantraSriyantra
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या साक्षात वास्तव्याने ही नगरी पवित्र झालेली आहे. अनादी कालापासून या शक्तीचे स्वरुप वेदांनी वर्णन केलेले आहे. तसेच पुराणांतही त्या स्वरुपाचे अनंत रुपामध्ये प्रगटिकरण केले आहे. देवी महात्म्याच्या पहिल्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात देवीला महामाया असे संबोधले आहे. करवीर निवासिनी ही आदिशक्ती आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्ये करवीर पीठ हे देवीचे महत्त्वाचे पीठ मानले जाते. देवी भागवताच्या प्तम स्कंदातील अडतीसाव्या अध्यायात या शक्तिपीठांचा उल्लेख आहे.
कोल्हापूर महा स्थानं यत्र लक्ष्मी सथा स्थिता ।१।
मातृःपरं द्वितीबंध रेणुकाधिष्ठीतं परम् ।२।
तुळजापुर तृतीय स्थान सप्तशृंग तदैवच ।३।
यानुसार महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका ही तीन पीठे पूर्ण पीठे आहेत व वणीची सप्तशृंगी हे अर्थे पीठ मानले जाते. ज्यामध्ये करवीरच्या महालक्ष्मीला महत्त्वपूर्ण मानले जाते.

भक्ती उपासना
आदिशक्ती, जगत्जननी श्री करवीर निवासिनी करवीर क्षेत्र व करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हे अत्यंत प्राचीन शपित्तपीठ आहे. पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली. १८ पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, मार्कंडेय पुराण भारत वगैरे ग्रंथाल या क्षेत्राचा उल्लेख आहे. अनेक राजधराण्यांनी या देवीची मनोभावे सेवा केलेली आहे.

वारणास्याधिकं क्षेत्रम् करवीरपुरं महत्।  
काशीक्षेत्राहून करवीर क्षेत्र हे यवाधिकं श्रेष्ठ आहे. श्री विश्वेश्वराचे काशी हे स्थान आहे. तर परात्पर शक्तीचे श्री महालक्ष्मीचे करवीर हे स्थान आहे. काशी खंडामध्ये या क्षेत्राचा दक्षिणकाशी म्हणून उल्लेख प्रामुख्याने आलेला आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी बद्दल यापूर्वीच्या बाराशे वर्षात विविध राजघराणे व तिच्या भक्तांनी जे शिलालेख लिहून ठेवले आहेत त्यावरून या स्थानाची प्राचिनत्वता सिद्ध होते.

दक्षिणेमध्ये मुघलांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या व त्यांच्याकडून मूर्ती व देवळे उद्ध्वस्त होऊ लागली. सुमारे १६ शतकात श्री महालक्ष्मीची मूर्ती संरक्षणासाठी म्हणून कपिलतीर्थ जवळ ठेवलेली होती. कालांतराने करवीर संस्थानचे पहिले छत्रपती श्री संभाजी महाराज उर्फ शंभू छत्रपती यांच्या राजपत्राने अर्थात आज्ञेनुसार इ. स. १७२३ ला करवीर निवासिनीची पुनः प्रतिष्ठापना मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात करण्यात आली.

अनेक ग्रंथांमधील देवीचे वर्णन
धृत्वा श्री मातुर्लिगं तद्यपरिच
गदां खेटकं पान पात्रम ।
नागं लिंगंच योनि शिरसी धृतयती
राज ते हेमवर्णा ।।
श्री करवीर निवासिनीची मूर्ती ही अत्यंत मनोहर आहे, गर्भगृहात ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात गदा, डाव्या हातात खेटक (ढाल) आहे. खाली असलेल्या उजव्या हातात महाळुंग व डाव्या हातात पानपात्र आहे. नवव्या शतकाच्या पूर्वीच्या मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यमध्ये देखील या देवीचे वर्णन आढळते. जगातील सर्व शक्तींना आणि सर्व जगताला कारणीभूत असलेली, सत्व, रज, तम या तीन गुणांनी युक्त नाना आकार, नाना क्रिया, नाना संज्ञा धारण करणारी, परम-सामर्थ्याने संपन्न असणारी, सर्वांच्या हृदयात राहून सर्वाच्या क्रियेवर लक्ष ठेवणारी, सगुण व निर्गुण अशी दोन रुपे असणारी जी देवता ती महालक्ष्मी! उत्कृष्ट सुवर्णप्रमाणे आरक्त वर्णामुळे शोभून दिसणारी, उत्कृष्ट सुवर्णभूषणांनी आलंकृत असलेली, म्हाळुंग, गदा, ढाल व सुधापात्र हातात घेतलेली व नाग, लिंग, योनि अशी आभूषणे मस्तकी धारण करणारी अशी महालक्ष्मी ही सर्वेश्वंतंपन्न व सर्वौंदर्यसंपन्न आहे. ती परममंगल आहे. अशा या जगदंबेची सुवर्ण अलंकारयुक्त पूजा बांधलेली मूर्ती अतिशय मोहक सजीव वाटते. जिच्या नेत्रांमध्ये काजळ, कपाळावर सौभाग्यकुंकुम मळवट, नाकात रत्नजडित हिऱ्यांची नथ, सुवर्ण व रत्नजडित कर्णेभूषणे, मयूरकुंडले, मस्तकावर विविध नवरत्नांकीत सुवर्णाचा मुकुट, व अंगावर भरजरी विविध रंगाचे शालू व भरजरी वस्त्रे व कंठात सुवर्णाचे विविध प्रकारचे अलंकार, तसेच भरजरी शालूमधील पंख्याची पूजा अगर खडी पूजा, हातामध्ये सुवर्णाची गदा, खेटक, पानपात्र पायात सोन्याची जोडवी, साखळ्या, तोडे, कवड्यांची माळ गैरे आभूषणांनी नटलेल्या या देवीचे दर्शन म्हणजेच साक्षात सात जन्मांची पुण्याई लाभली असे म्हणतात.

देवीचे गर्भगृह
आधुनिक विज्ञानाच्या मान्यतेप्रमाणे बिंदू संकल्पना म्हणजे अस्तित्व असणारी पण लांबी, रुंदी, आकार कोणतेही परिमाण नसणारी संकल्पना होय. हेच स्वरूप देवीच्या तत्वाचे आहे, असे मानतात. आद्य शंकराचार्य यांचे गुरु गोविंद पदाचार्य व त्यांचे गुरु गौड पदाचार्य यांनी रचलेल्या सुभोगोदय स्तोत्र यामध्ये श्री यंत्राच्या स्थानाला कौला: असे संबोधलेले आहे. श्री महालक्ष्मी मंदिराचा मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्राच्या बाह्यारचनेप्रमाणे १६ काटकोनात फिरतो. त्याच्या केंद्रस्थानी म्हणजेच मुख्य गाभाऱ्यात लाकडी मेघडंबरीत शिव व शक्तीचे एकाकार रूप असणारी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी जगदंबा नारायणी कौला: स्थानी विराजमान आहे.

वाडी रत्नागिरी म्हणजेच जोतिबा येथील श्री हरी गोपाळ अंगापूरकर देशमुख यांनी १८ व्या शतकाच्या अखेरीस रचलेल्या 'लक्ष्मी विजय' या ग्रंथात कोल्हापूरची महालक्ष्मी व त्र्यंबोली देवी यांच्या झालेल्या संवादागध्ये 'तुझ्यासाठीच श्री यंत्रार मंदिर निर्मिले' असा उल्लेख आढळतो. विश्वाचे संचलन करणाऱ्या या आद्यशक्ती जगदंबा व तिच्या लिलावताराचे व स्वरुपाचे स्थान तसेच ब्रह्माण्डातील सर्व  ग्रह, तारे, देव देवता यांचेही स्थान या श्री यंत्रात आहे, अशी भक्तांची भावना आहे. अशा श्री यंत्राकृती मंदिराच्या मुख्य गर्भगृहात जगतजननी नारायणी उभी आहे.

• सौरभ मुजुमदार, कोल्हापूर



Back to content