श्री गयेश्वर - दक्षिण काशी

Go to content

श्री गयेश्वर - दक्षिण काशी

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री गयेश्वर - दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले, विविध प्राचीन धर्मग्रंथात उल्लेखित असलेले मंदिर म्हणजे श्री गयेश्वर मंदिर.

कोल्हापुरातील सोमवार पेठ येथील देशभूषण हायस्कूल, दिशा डायग्नोस्टिक सेंटर समोरील मंदिर म्हणजे श्री गयेश्वर मंदिर होय. दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथून लक्ष्मीपुरीकडे जाताना पहिलाच फाटा असणारा रस्ता येथे रद्दी-कागद विक्रीची मोठी दुकाने आहेत. या शेजारीच हे मंदिर आहे. "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता" या प्राचीन ग्रंथामध्ये 'गया पूर्व दिग्भागे फलगुतीर्थ सन्गिधौ गधाधर रुपो विष्णुः।तस्येव पूर्वतःविष्णुदं' असे उल्लेख आढळून येतात. आता सध्या महानगरपालिकेने कदमवाडी भाग विकसित केला आहे. हा भाग म्हणजे श्री गयेश्वर तसेच रुद्रगया यासाठी राखीव ठेवलेली जमीन होती. या जमीनीतून येणाऱ्या उत्पन्नातून धार्मिक उत्सवाचा खर्च खर्ची पडत असे. तशा अनुषंगाचे संस्थानकालीन मोडी लिपीतील कागद वाचता आले. नंतरच्या काळात हे मंदिर श्री सारडा यांच्या आप्तजनाकडे आले. आज श्री फल्गुलेश्वर मंदीर हे पहावयास मिळते. आज फल्गु नदी कोल्हापूरच्या इतिहासातून लुप्त झाली आहे. पण फल्गु नदी या क्षेत्रातून वहात होती असे उल्लेख आढळून येतात. जमीन सपाटीपासून पाच ते सहा फूट खाली असणारे हे मंदिर आज जुन्या काळातील स्थानमहात्म्य दर्शवते.

काशी, गया आणि प्रयाग ही स्थाने मुक्तीस्थान असल्यामुळे अनेक महनीय व्यक्ती, साधू यांनी या स्थानी येऊन साधना केली आहे. या ठिकाणी येथे श्री गयेश्वर स्थाना बरोबर इथे काही दगडात कोरलेले पाय- पादुका आढळून येतात. गधाधारी श्री महाविष्णूची मूर्ती याच बरोबर येथे एक पाय विष्णूपदं तर एक-एक पाय- पादुका हे श्री जमदाग्नी, ब्राह्मण, अत्री, चंद्र, इंद्र, कश्यप, गरुड,गणेश, आहवनीय, गार्हपत्य, अग्नि, आदित्य, कार्तिकेय, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथव्रण, अगस्त्य, गर्ग अशी पदकमले दर्शवली आहेत.बारा बाय बारा दगडी एकपाकी प्राचीन मंदिर आणि उंचीही जेमतेम तेवढीच. या मुख्य मंदिरा सभोवती सर्वसाधारण तीस बाय साठ आर.सी.सी. मंडपवजा एक मजली इमारत उभा केली आहे. या मडंपामध्ये कोटा फरशी बसवली असून या मंडपाच्या मधोमध असणाऱ्या या मंदिरात पाच-सह् पायर्या उतरून खाली जावे लागते. या मंदिरा शेजारीच दहा बाय दहा आकारातील श्री लक्ष्मीनारायणाचे खूप छान मंदिर उभा केले आहे. संगमरवरी दगडातील सुंदर श्री मुर्ती खूपच आखीव-रेखीव आहेत.

सत्संग सेवा केंद्र, सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या रुपाने मंदिर परिसर खूपच सुंदर ठेवला आहे. या परिसरात जुन्या काळातील मंदिराचे कोरीव दगड आढळून येतात. हे दगडी शिल्प तसेच प्राचीन मंदिराचे खांब हे अप्रतिम कोरकीपणाची उदाहरणे आहेत. दक्षिण काशी क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असून सुद्धा मुख्य रस्त्याशेजारी मंडप वजा इमारत आणि आत मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर एवढीच ओळख सद्यस्थितीत शिल्लक राहिली आहे.

असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान लाभलेले श्री गयेश्वर मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर-औरंगाबाद, मोबाईल नंबर - ९३७०१०१२९३.


Back to content