जगदंबेची पुनः प्राणप्रतिष्ठा आणि आरंभ करवीरच्या वैभव पर्वाचा!
Published by Prasanna Malekar in History of Kolhapur · Friday 26 Sep 2025
Tags: जगदंबेची, पुनः, प्राणप्रतिष्ठा
Tags: जगदंबेची, पुनः, प्राणप्रतिष्ठा
साधारणपणे सतराशे दहा चा काळ. महाराणी सरकार ताराबाई साहेबांनी करवीर संस्थान ची स्थापना केली. मोठ्या कष्टाने परकीय स्वकीय अशा अनेकांच्या विरोधकांचा सामना करून सहा खेड्यांच हे गाव राजधानीच्या रूपाला आलं. पुराणकालात अविमुक्त काशी किंवा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले एक करवीर आता संस्थान करवीर झालं. इतके दिवस जगदंबेच्या रूपाने इथं भक्तीचं वैभव नांदतच होतं, पण संस्थानच्या स्थापनेनं एक सर्वाधिकार प्राप्त झाला. तंजावर पर्यंत या करवीर क्षेत्राची महती राजधानी कोल्हापूर म्हणून पोहोचली. हे सगळं करत असताना ज्या मूळ प्रेरणेने स्वराज्याची स्थापना झाली त्या मूल्यांची जपणूक तर करवीर छत्रपती प्राणपणाने करतच होते.
अशातच एके दिवशी नरहरी सावगावकर यांनी पन्हाळा मुक्कामी जाऊन करवीर छत्रपती यांची भेट घेतली आणि शंभू छत्रपती यांना विनंती केली; आवांतराचे भयास्तव करवीर निवासिनी ची मूर्ती पुजारी यांचे घरी लपवून ठेवली ती आता पुन्हा प्रतिष्ठा करावी. देव, देश आणि धर्मासाठी सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपतींच्या मनामध्ये आनंद झाला. सिदोजी घोरपडे गजेंद्रगडकर यांना पुढाकार घेऊन ही मूर्ती पुन्हा मंदिरात बसवण्याची आज्ञा केली. छत्रपतींची आज्ञा झाली आणि मन्मथ नाम संवत्सर इंदूवासर (सोमवार) विजयादशमी ( दसरा) म्हणजे २६/९/१७१५ या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई च्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना झाली.
आज या घटनेला ३१० वर्षं पूर्ण झाली. आजही एक जगदंबा भक्त म्हणून , ज्यांच्या आज्ञेनुसार ही मूर्ती पुन्हा मंदिरात आली ते करवीर छत्रपती कै. श्रीमंत संभाजी महाराज, ज्यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा केला ते कै. सिदोजी घोरपडे गजेंद्रगडकर, ज्यांच्या विनंतीवरून हा सोहळा घडला ते नरहरभट सावगावकर आणि अवांतराचे काळात ज्यांनी मूर्ती जपली ते जगदंबेचे पुजारी अशा सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. आणि जगदंबेला विनंती करतो की आई जगदंबे चंद्र सूर्य आहेत तोवर या करवीरचं भौतिक, आध्यात्मिक वैभव असंच चढत वाढतं ठेव !
उदयोस्तू जगदंबा !
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः