शेकडो वर्षांची अविरत परंपरा असलेला अंबाबाईचा पालखी सोहळा

Go to content

शेकडो वर्षांची अविरत परंपरा असलेला अंबाबाईचा पालखी सोहळा

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Sourabh Mujumdar in Festivals in Mahalaxmi temple Kolhapur · Saturday 27 Sep 2025
Tags: LalitaPanchami
श्री यंत्राकृती सोळा काटकोनात फिरणारा वैशिष्ट्यपूर्ण असा अंबाबाईचा प्रदक्षिणा मार्ग. ज्याच्या सर्वोच्च शक्तिस्थानावर मध्यभागी गर्भगृहात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी साक्षात भक्तांना दर्शन देण्यासाठी उभी आहे. देवीच्या अनेक वार्षिक उत्सवांमधील महत्वपूर्ण उत्सव म्हणजेचं शारदीय नवरात्र उत्सव होय. या नवरात्र उत्सवातील मौल्यवान सोहळा म्हणजेच देवीचा पालखी सोहळा.

स्थानिक क्तांसह परगावचे भक्त देखील ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात असा हा अभूतपूर्व देवीचा पालखी सोहळा. परंतु देवीच्या या पालखी सोहळयाचे एक वैशिष्ट्य आहे. बऱ्याच देवस्थानांचा पालखी सोहळा हा पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बंद होती व नंतर पुन्हा चालू होतो. परंतु कदाचित देवीचे हे एकमेव स्थान असे आहे की जिचा पालखी सोहळा शेकडो वर्षांपासून अविरतपणे चालुच आहे. ज्यामध्ये आज अखेर कधीही खंड पडलेला नाही.

दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मंदिर परिसरातच पालखी परिक्रमेसाठी आई अंबाबाई गर्भगृहातून बाहेर पडते. देवीचे मानकरी चोपदारांमार्फत ललकारी झाल्यावर भरजरी शालू व विविध सुवर्ण अलंकार परिधान करून श्रीपूजकांच्या करकमलातून देवी पालखीमध्ये विराजमान होण्यास बाहेर पडते. या पालखी सोहळ्यातूनच देवीच्या वैभवपूर्ण परपरेची कल्पना येते. या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षापासून राजाश्रय आहे. करवीर देवीची ललकारी पालखी सोहळयावेळी चोपदार सेवेकरी मार्फत ललकारी प्रत्येक वेळी दिली जाते. ती अशी ''नवकोट नारायणी, भक्तजन प्रतिपालिनी, जगध्दोचारिणी, राज राजेश्वरी, सर्वेश्वरी, लक्ष लक्ष दिना परमेश्वरी, चतुर्धारिणी, श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी!''

संस्थानचे छत्रपती परिवारासह या सोहळ्याला उपस्थित असायचे. छत्रपतींनी साक्षात स्वतःपेक्षाही मोठा लवाजमा देवीच्या पालखी सोहोळ्यासाठी दिलेला होता. उंट, हत्ती, घोडे, भालदार, चोपदार, सरंजामदार, इनामदार, शासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. त्याची साक्ष देणारा देवीच्या सोहळ्यामध्ये एक पट्टेवाला सेवेकरी असतो. त्याच्या गळ्यामध्ये एक पट्टा व पितळी धातूचा एक बिल्ला आहे. त्या बिल्ल्यावर स्पष्टपणे 'श्री माहालक्ष्मी करवीर KOLHAPOOR नं. १३' कोरलेले आहे.

गर्भगृहातून बाहेर पडल्यावर देवी सर्वप्रथम दत्त मंदिरासमोर त्यानंतर मनकर्णिका कुंडा जवळ थांबते. घाटी दरवाजामधून अगस्ती लोपामुद्रा असणाऱ्या दीपमाळेला प्रदक्षिणा घालून श्री व्यंकटेशाच्या मंदिरासमोर बांबते. नंतर श्री कात्यायनी मंदिर, श्री शनी मंदिर, छोटी अंबाबाई, महाद्वार व शेवटी गरुड मंडपातील सदरेवर विराजमान होते. या सात टप्प्यांवर पालखी थांबते. त्यावेळी तिच्यासमोर भक्त गायन सेवा करतात. यालाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. शारदीय हा मान मंदिरात्मा संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल मुस्लिम समाजातील नायकिणीकडे होता. ज्या घराण्याने देवीची सेवा कित्येक वर्षे केली. पालखी परिक्रमा सोह‌ळा आपल्या मनात साठवण्यासाठी अबालवृद्ध भक्त
हजेरी लावीत असतात.

छायाचित्र -
ललिता पंचमीचे त्र्यंबोली टेकडी येथे असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या पालखीचे दुर्मिळ छायाचित्र.

-
सौरभ मुजुमदार
कोल्हापूर.



Back to content