शारदीय नवरात्रोत्सव २०२५ - दिवस पहिला

Go to content

शारदीय नवरात्रोत्सव २०२५ - दिवस पहिला

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Prasanna Malekar in Festivals in Mahalaxmi temple Kolhapur · Monday 22 Sep 2025
Tags: Navratri2025
शारदीय नवरात्रोत्सव २०२५ - दिवस पहिला

आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस; अर्थात प्रतिपदा. तिथीला आजच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची दश महाविद्यांपैकी कमला या स्वरूपामध्ये पूजा बांधण्यात आलेली आहे.

दक्ष प्रजापतीच्या यज्ञासाठी निमंत्रित नसताना सतीने माहेरी जाऊ नये असं भगवान शंकरांचे मत होतं. परंतु आपलं जाणं हे केवळ माता-पित्याच्या ओढीने नव्हे तर शिवतत्त्वाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेसाठी आहे असं सांगून माता सतीने स्वतःच्या स्वरूपातून भगवान शंकरांना दशमहाविद्यांचे दर्शन घडवले. या महाविद्यांपैकी एक असणारी कमला म्हणजे साक्षात लक्ष्मीस्वरूपीणी देवता.  अभय, वरद आणि वरच्या दोन हातामध्ये कमळ कळ्या धारण करणाऱ्या या कमला स्वरूपाला सागर मंथनातून प्रगट झाल्यानंतर अष्ट दिग्गजांनी अमृत अभिषेक घातला अशी कथा प्रसिद्ध आहे. या कमलात्मिका तत्त्वाचे सदाशिव भगवान नारायण असून दशमहाविद्यांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक देवीचे शक्ती स्वरूप आणि तिचे सदाशिव तत्व यांची जोड घातली आहे. दशमहाविद्यांचा संबंध फक्त देवी स्वरूपाचा नसून भगवान विष्णूंच्या दहा अवतारांशी देखील असल्याचे मानले जाते.  

कमला देवीची उपासना भौतिक अर्थात साधकाला अपेक्षित असणाऱ्या सर्व ऐहिक भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी केली जाते. दशमहाविद्यांमध्ये कमलात्मिकेचे तंत्र हे एक स्वतंत्र तंत्र आहे. मिताचारप्रिया असे कमलेचे वर्णन केले जाते. सुख-शांती-समृद्धी याची देवता असणाऱ्या कमलेच्या रूपात सजलेली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई सर्व भक्तांना ऐहिक पारलौकिक सुखाने समृद्ध करू दे; हीच जगदंबा चरणी प्रार्थना.

श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः


Back to content