शारदीय नवरात्र २०२५ - दिवस दुसरा

Go to content

शारदीय नवरात्र २०२५ - दिवस दुसरा

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
शारदीय नवरात्र २०२५ - दिवस दुसरा

करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई महाविद्यांपैकी एक 'बगलामुखी' या स्वरूपामध्ये सजली आहे.

पूर्वी कृतयुगामध्ये भयंकर असा वात क्षोभ म्हणजे वादळ सुरू झाल्यावर भगवान नारायणाने सौराष्ट्र देशातील हरिद्रा तीर्थाच्या तीरावर तप सुरू केले. त्या वेळेला त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन वीर रात्री म्हणजे चतुर्दशी आणि मंगळवार या योगावर तसेच मकार युक्त नक्षत्रावर महात्रिपुरासुंदरी प्रगट झाली तिच्या हृदयातून एक पीत वर्ण ज्वाला प्रगट होऊन त्या ज्वालेने द्विभुजा आकार धारण केला आणि या वात क्षोभाचे शमन केले तीच ही बगलामुखी देवी. बगलामुखी देवी पीत वस्त्र म्हणजे पिवळे वस्त्र धारण करत असल्याने तिला पितांबरा असे सुद्धा नाव आहे.
बगलामुखी देवीचे वर्णन करताना तिने एका हाताने शत्रूची जीभ ओढलेली असून दुसऱ्या हातामध्ये मुद्गर घेऊन ती शत्रूला मारत आहे अशा प्रकारचे ध्यान केले जाते. चतुर्भुजा स्वरूपात तिच्या हातामध्ये वज्र पाश ही आणखी दोन आयुधे असल्याचे मानले जाते.

भगवान विष्णूच्या दशावतारातील कूर्म अवताराशी या देवीचा संबंध असून या देवीचे सदाशिव त्र्यंबक तर भैरव आनंद भैरव किंवा मृत्युंजय या नावाने ओळखला जातो.

बगलामुखीची उपासना ही शत्रूच्या स्तंभनासाठी म्हणजे शत्रूची शारीरिक‌ बौद्धिक ताकद थांबवण्यासाठी केली जाते. बगलामुखीचे वैशिष्ट्य म्हणजे इतरांनी केलेल्या अभिचार कर्मातून मुक्तता होण्यासाठी सत्वर फळ देणारी ही देवता मानली जाते. परंतु अधिकारी गुरुशिवाय आणि तशाच प्रबळ कारणाशिवाय बगलामुखीची उपासना करणे हे आत्मघातासारखे ठरते.

वास्तविक तंत्रोक्त देवता या केवळ इतरांना त्रास देण्यासाठी किंवा स्वतःच्या  भौतिक फायद्यासाठी नसून त्या आत्म उन्नतीसाठी आहेत. बगला हा शब्द वल्गा या शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्याचा अर्थ लगाम शत्रूच्या कृतींना लगाम घालणारी ही देवता. हिची उपासना बाह्य शत्रूंच्यासाठी करण्यापेक्षा अंतस्थ शत्रूच्या स्तंभनासाठी केली पाहिजे. बगले च्या नावातला मुख हा शब्द म्हणजे तोंड असा नसून बाहेर पडण्याचा मार्ग अशा अर्थाने घेतला जातो. थोडक्यात भगवतीच्या रक्षक शक्तीचा नि:सारण मार्ग म्हणून तिला बगलामुखी असे म्हणता येईल.
बगलामुखीच्या रूपामध्ये सजलेली करवीर निवासिनी आपल्या अंतस्थ शत्रूंचा नाश करून शाश्वत सुखाकडे वाटचाल करण्यासाठी आपली रक्षक ठरो हीच जगदंबा चरणी प्रार्थना.

श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः



Back to content