इतिहास शहराखाली दडलेल्या तळ्यांचा
अचानक आलेला अवकाळी पाऊस व त्यालाच जोडून हातात हात घेऊन आलेला मान्सून याने संपूर्ण जिल्ह्यासह शहर पाणीमय करून टाकले आणि तळ्यांचे शहर म्हणून काही वर्षांपूर्वी संत महंत,इतिहास अभ्यासक व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या कोल्हापूरची आठवणीची पाने आपोआपच उलगडू लागली.
कोल्हापूर शहर । जसं विंचवाचं तळ।
वस्ती केली तुझ्यामुळं ।अंबाबाई ॥१॥
कोल्हापूर शहर। पाण्याच्या डबक्यात ।
फुलाच्या झुबक्यात। अंबाबाई॥२॥
कित्येक वर्षांपूर्वी तळी व बागा यांच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर. आज अनेक मुजविलेल्या तळ्यांनी पुन्हा गतरूप प्राप्त केले आणि हे लक्षात आले. रंकाळा, पदमाळा, सिद्धाळा, वरूणतीर्थ, फिरंगाई, खंबाळे, रावणेश्वर, कोटीतीर्थ, सुसरबाव, महारतळे, कपिलतीर्थ, साकोली, कुंभार तळे, अशा अनेक तळी, विविध कुंड व नैसर्गिक झऱ्यांच्या डबक्यांनी कोल्हापूर शहराला जणू जलदेवतेचा आशीर्वादच होता.
परंतु कालांतराने शहर सुधारणे अंतर्गत इ.स. १९४१ ते १९४७ या काळात अनेक तळी व तलाव मुजवण्याचा विशेष कार्यक्रम कोल्हापूर नगरपालिकेने हातात घेतला. ज्या अंतर्गत सर्वप्रथम कपिलतीर्थ मुजवून ती जागा ताब्यात घेण्यात आली, यानंतर इंद्रकुंड (बहुतेक महाद्वार रोड लगतचे) मुजविले, यानंतर महार तलाव मुजवून तेथे लक्ष्मीपुरी वसाहत केली. सुसरबाग तलाव मुजवून हरिहर विद्यालय सुरू झाले, गंगावेश येथील कुंभार तलाव मुजवून उद्यान केले, डमक मुजवूनही बाग करण्यात आली, पेटाळे तलाव मुजवून ती जागा न्यू एज्युकेशनला दिली, वरूणतीर्थ पहिल्या टप्प्यात पूर्णपणे कोरडे केले, बावन्न एकरांचा पद्माळा तलाव कोरडा करून शेतीखाली आणला, मस्कुती तलाव मुजवून वसाहत केली, रावणेश्वर तलाव मुजवून क्रीडांगण केले. अशा कैक तलाव व तळ्यांना मुजवून त्यांचा समावेश विकासात केला गेला. परंतु काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना याच नैसर्गिक तलावांचा सुयोग्य वापर करून योग्य नियोजनाने कित्येक तलावांच्या काठाशी एक सुंदर व शिस्तबद्ध, पर्यावरण पूरक असे शहर वसविण्याची इच्छा होती पण ती काही पूर्णत्वास गेली नाही.
पेटाळा व वरूणतीर्थ तलावांचा भौगोलिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा
आज दिमडीभर जरी पाऊस झाला तरी शहराच्या मध्यवस्तीतील सिद्धाळा, पेटाळा, वरूणतीर्थ हा संपूर्ण परिसर क्षणात जलमय होऊन चिखल व दलदल पसरते. शेकडो विद्यार्थी, रहिवासी, पर्यटक यांना जीव मुठीत घेऊनच संसर्गजन्य आजाराला दरवर्षी सामोरे जावे लागते. कित्येकांना याचा जन्मभर फटका बसतो. यामुळे हा प्रश्न कायमचा मिटवायचा असेल तर याच्या भौगोलिक इतिहासाचा पाण्याचा प्रवाहाचा अभ्यासाची नितांत गरज आहे. जुन्या कागदपत्रांवरून त्या संदर्भातील खालील माहिती उजेडात येते.
शहरातील अस्वच्छता, अनारोग्यकारक वायू व डास यांच्या पैदासास हिच विविध तळी कारणीभूत ठरली. परंतु रिजन्सी कौन्सिलच्या मदतीने या समस्येवर कायमचा उपाय म्हणून ही तळी मुजविण्याचा कोल्हापूर नगरपालिकेने उपाय योजिला.
वरूणतीर्थ तळ्याचे त्यावेळी नोंदविलेले क्षेत्र हे १० एकर १५ गुंठे इतके विशाल होते. ४ सप्टेंबर १९४३ रोजी हा भव्य दिव्य तलाव मुजवण्याचे काम चालू झाले. याची सर्वसाधारण खोली दहा फूट खोल असल्याने सर्व प्राथमिक बाजू पाहता हा तलाव मुजविणे फार आव्हानात्मक, खर्चिक, व बराच काळ लागणार हे स्पष्ट होते. या तळ्याच्या दक्षिणेला पाणी आत येण्यासाठी दोन मोरी होत्या व उत्तरेला पाणी बाहेर काढणारी एक मोरी होती. दक्षिणेकडील या दोन मोरींपैकी पूर्व बाजूची मोरी व उत्तरेकडील मोरी सरळ रेषेने जोडून त्याच्या पूर्वेकडील सर्व भाग भरून घेण्याचा कालावधी जून १९४४ निश्चित केला. ज्याला रुपये वीस हजार खर्च व ज्यामुळे तीन एकर जागा उपलब्ध होईल असे नियोजन करण्यात आले. तसेच तळ्याचा उत्तरेकडील रस्ता २५ ते ३० फुटांचा होता तो १०० फुटाचा करण्याचे ठरविले. यानंतर या तळ्याचा पूर्व दक्षिण कोपऱ्याचा थोडा भाग न्यू एज्युकेशन सोसायटीला, पूर्व बाजूच्या थोड्या जागेत एक प्राथमिक शाळा व उर्वरित जागेत क्रीडांगण, रविवारचा बाजार, अथवा एखादे उद्यान करण्याचे निश्चित केले. यानंतर पेटाळा तलावही मुजविण्यात आला.
_______
फोटो
कोल्हापूर संस्थानातील महान दरबारी चित्रकार मा. अबालाल रहिमान यांच्या कुंचाल्यातून साकारलेले इ. स. १९२३ चे बावन्न एकरांमध्ये पसरलेल्या तत्कालीन पद्माळा तलावाचे दुर्मिळ तैलचित्र.
सौरभ मुजुमदार,
कोल्हापूर.