छत्रपती आबासाहेब व बुवासाहेब महाराज

Go to content

छत्रपती आबासाहेब व बुवासाहेब महाराज

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
लेखमाला : पंचगंगा नदी काठावरील श्रद्धास्थाने (भाग - ४)

छत्रपती आबासाहेब व बुवासाहेब महाराज

सौरभ मुजुमदार,
कोल्हापूर

स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज - दुसरे यांच्या समाधी मंदिराला लागूनच थोड्या आतील बाजूस असणाऱ्या पूर्वाभिमुख मंदिरात आपणास एकाच गर्भगृहात दोन शिवलिंग पहावयास मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांच्यानंतर करवीर संस्थानचा राज्यकारभार त्यांचे सुपुत्र शंभूराजे उर्फ आबासाहेब महाराज व नंतर दुसरे सुपुत्र शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांनी सांभाळला. करवीरच्या या दोन्ही छत्रपतींच्या समाधी मंदिरातच ही एकत्रित दोन शिवलिंगे आजही येथे पहावयास मिळतात.

आबासाहेब महाराजांची कारकीर्द ही इ. स. १८१३ ते इ. स. १८२१ अशी केवळ नऊ वर्षांचीच होती. शेवटच्या तीन-चार वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय केवळ  वीस वर्षांचे होते. परंतु त्यांच्याच कारकिर्दीमध्ये इचलकरंजीकरांशी तह झाला आणि चिकोडी व मनोळी तालुके संस्थानाला परत मिळाले. यांच्याच काळात घडलेली महत्त्वपूर्ण घटना म्हणजे पेशवाईचा अस्त झाला.

यानंतर करवीर संस्थानाचा राज्यकारभार पाहणारे छत्रपती म्हणजे शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज होय. त्यांचा राज्यकारभाराचा कालावधी हा इ. स. १८२१ ते इ. स. १८३७ असा सोळा वर्षांचा होता. बुवा साहेब महाराज गादीवर बसले त्यावेळी त्यांचे वय अवघे १४ वर्षांचे होते. त्यांना शिकारीची आवड होती. गव्हर्नर भेटीच्या वेळी त्यांनी घोड्यावरून भाल्याने हरणाची शिकार मोठ्या कौशल्याने केलेली .

ऐतिहासिक नगारखान्याची उभारणी करणारे बुवासाहेब महाराज

बुवासाहेब महाराज अतिशय शूर व एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालण्यास तयार असत. इ. स. १८३० ला त्यांनी रंकाळा तलावाचे पाणी नळाद्वारे कोल्हापूर शहरात आणले. ब्रह्मपुरी जवळच्या ओढ्यावर घाट बांधला. इ. स. १८३४ मधील त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे जुना राजवाडा समोरील नगारखान्याची इमारत पूर्ण झाली. त्यासाठी ५००० लोकांसह महाराज स्वतः जोतिबा देवाच्या डोंगरावर गेले व तेथील दगड काढण्यास प्रारंभ केलेला होता. याच नगारखान्याच्या कमानी खालून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई जगदंबेचा रथ, अष्टमीचे वाहन, ललिता पंचमी व विजयादशमीची सुवर्ण पालखी मोठ्या थाटामाटात एका वेगळ्याच भक्तिभावाने मार्गस्थ होते. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानमध्ये स्वच्छता व न्यायदानाच्या व्यवस्थेमध्ये अमुलाग्र क्रांती झाली.

बुवासाहेब महाराजांनी दोन पुत्ररत्न झाल्यावर इ. स. १८३८ च्या जानेवारी महिन्यामध्ये भोसले घराण्याची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाण्याचे निश्चित केले. दर्शनास निघण्यापूर्वी त्यांनी भवानी मातेला हस्तिदंती कलाकुसरीचे शयनासन व सिंहासन तसेच अनेक वस्त्रे व अलंकार देवीसाठी तुळजापुरास पाठविलेले होते. परंतु अखेर ऑक्टोबर मध्ये राजवाड्यावरील श्रींचा नवरात्र सोहळा संपन्न झाल्यावर मगच  प्रत्यक्ष भवानी मातेच्या दर्शनासाठी प्रस्थान करावे लागले. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला त्यांनी पंढरपूरच्या विठोबा रायांचे दर्शन घेतले. पुढे तुळजापुरला जाताना वाटेतच येवती मुक्कामी महाराजांची प्रकृती अधिकच बिघडली व २९ नोव्हेंबर १८३८ रोजी बुवासाहेब महाराज यांचे निधन झाले.

करवीर संस्थानच्या जडणघडण मधील छत्रपती घराण्याच्या मौल्यवान कार्याची साक्ष देणारी ही पंचगंगा नदी काठावरील समाधी मंदिरे आपण आवर्जून जवळून पहावी तरच त्यांच्या कार्याच्या स्मृती पुढील पिढीपर्यंत पोहोचतील.

पंचगंगा घाटाचे छायाचित्र -
श्री संदीप राजगोळकर याच्या 'X अकाउंट' वरून


Back to content