पन्हाळगडावरून करवीरात राजधानी आणणारे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)

Go to content

पन्हाळगडावरून करवीरात राजधानी आणणारे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Sourabh Mujumdar in History of Kolhapur · Friday 16 May 2025
Tags: HistoryofKolhapur
प्रत्यक्ष लढाईत सहभाग घेणारे छत्रपती
विस्तीर्ण पद्माळा तलावाची निर्मिती

सौरभ मुजुमदार,
कोल्हापूर

संभाजी महाराज करवीरकर उर्फ शंभू छत्रपती यांच्या समाधी मंदिराला लागूनच असणारे, की स्टोन आर्च वास्तुशास्त्र पद्धतीने साकारलेले, अत्यंत सुबक गुळगुळीत  दिसणाऱ्या पाषाणातील,विलक्षण कोरीव नक्षीकाम असणारे भव्य दिव्य मंदिर म्हणजेच करवीर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)- खानवटकर घराणे यांचेच होय. जिजाबाई राणीसाहेब यांनी शहाजी भोसले खानवटकर घराणे यांच्या सुपुत्रांना २२ सप्टेंबरला यथाविधी दत्तक विधान केले आणि विजयादशमीच्या सुमुहूर्तावर २७ सप्टेंबर १७६२ रोजी करवीरच्या सिंहासनावर बसविले. शिवाजीराजे यांनी जवळजवळ ५० वर्षे करवीरचा राज्यकारभार पाहिला. त्यांचा हा काळ अनेक घटनांनी भरलेला आहे. ज्यामध्ये त्यांचे अनेकदा पेशवे, पटवर्धन, सावंतवाडीचे भोसले, निपाणीचे देसाई, इचलकरंजीचे घोरपडे या सर्वांशी निकटचे संबंध आलेले होते.राज्यकारभाराच्या पहिल्या दहा वर्षात त्यांनी जिजाबाई राणीसाहेबांचे मार्गदर्शन घेतलेले होते. स्वतः हे छत्रपती निरनिराळ्या लढाईच्या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत असत. सावंतवाडी, इचलकरंजी, भुदरगड या लढाईत त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. अनेकदा ते जखमी देखील झालेले होते.

      याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पन्हाळा गडावरून करवीर संस्थानाची राजधानी कोल्हापुरात आणण्यात आली होती. त्यावेळी जुना राजवाडा व नजीकच्या सरदारांचे वाडे बांधण्यात आले. सोन्याच्या ताराराणीच्या श्री भवानी देवीच्या टाकासाठी आंबा देवघर बांधण्यात आले. याही छत्रपतींची देवादिकांवर व साधुसंतांवर अपार श्रद्धा होती. कृष्णा नदीकाठच्या श्री क्षेत्र नृसिंहपुर येथे तपश्चर्या करणाऱ्या साक्षात्कारी पुरुषाला स्वतः छत्रपती भेटण्यास गेले व करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी मोठ्या सन्मानपूर्वक करवीरात घेऊन आले. त्यांचा अनुग्रह घेऊन आपल्याच निवासस्थानाजवळ त्यांच्या  निवासाची व्यवस्था केली. तो साक्षात्कारी सत्पुरुष म्हणजेच करवीर संस्थानचे राजगुरू श्री सिद्धेश्वर बुवा महाराज होय. यांचे निवासस्थान आजही गुरु महाराज वाडा म्हणून ओळखले जाते.श्री  करवीर निवासिनीच्या नवरात्र उत्सवामध्ये देवीचे वाहन ज्यावेळी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. त्यावेळी याच वाड्यासमोरून पुढे जाते. ज्यावेळी १७२३ वैशाख वद्य षष्ठी सोमवार, या दिवशी श्री  सिद्धेश्वर बुवा महाराज परंधामवासी झाले त्यावेळी छत्रपती शिवाजी राजेंनी पंचगंगेच्या काठी त्यांची समाधी बांधून तेथे पादुका स्थापन केल्या व पूजेची व रथोत्सवासाठी  खर्चाची व्यवस्था केली.  जो रथोत्सव आजही पंडित महाराज घराण्याकडून अव्याहतपणे चालू आहे.

    कोल्हापूरला पाणी मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी राजेंनी विस्तीर्ण पद्माळा तलाव बांधला ज्याची पाहणी करण्यासाठी ते स्वतः जात असत. एके दिवशी असेच कामाची पाहणी करून आल्यावर महाराजांना अतिशय ज्वर आला व त्यामध्ये ते जास्तच आजारी पडले. नंतर शिवाजीराजे २४ एप्रिल १८१३ रोजी निधन पावले.

   या छत्रपतींना दोन सुपुत्र होते.एक संभाजी महाराज (दुसरे) उर्फ आबासाहेब महाराज व दुसरे शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज होय.

फोटो -
१) पंचगंगा नदी काठावरील संस्थान शिवसागर मधील छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांचे समाधी मंदिर
२) मंदिरात साकारलेली वैशिष्ट्यपूर्ण पूजा


Back to content