शारदीय नवरात्र २०२५ - दिवस चौथा
Published by Suhas Joshi in Festivals in Mahalaxmi temple Kolhapur · Thursday 25 Sep 2025
Tags: Navratri, 2025, Mahalaxmi, temple, Kolhapur
Tags: Navratri, 2025, Mahalaxmi, temple, Kolhapur
|| श्रीमाता ||
अश्विन शु. चतुर्थी,
गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५
पूजा क्रमांक ४ / महाविद्या क्र. ९
|| महाविद्या श्रीमातंगी माता ||
ध्यानम -
श्यामांगीं शशिशेखरां त्रिनयनां वेदैः करैर्बिभ्रतीम् |
पाशं – खेटमथांकुशं दृढमसिं नाशाय भक्तद्विषाम् ||
रत्नालंकरणं प्रभोज्ज्वलतनुं भास्वत् किरीटां शुभाम् |
मातंगीं मनसा स्मरामि सदयां सर्वार्थसिद्धिप्रदाम् ||
स्वरूप -
श्यामवर्णी, तीन नेत्र असलेली, माथ्यावर चंद्र धारण केलेली, चार हातांमध्ये भक्तांच्या शत्रूनाशासाठी अंकुश आणि तलवार, पाश आणि ढाल धारण केलेल्या रत्नालंकारांनी युक्त अशा दयावंत, सर्वसिद्धि देणाऱ्या मातंगीला माझा मनापासून नमस्कार आहे.
इतिहास -
भगवान शिव हे मतंग असून, त्यांनी त्रिपुरीची उपासना केली असता, त्यांच्या नेत्रतेजातून या देवीची उत्पत्ती झाली, किंवा (कल्पभेदाने) मतंगॠषींच्या कन्येच्या रुपात हिने अवतार घेतल्याने हिला ‘मातंगी’ म्हणतात. हि नववी महाविद्या असून, मतंग हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिची उत्पती वैशाख शुद्ध तृतीयेस आहे.
उपासना भेद -
लघुश्यामा, डच्छिष्टमातंगी, राजमातंगी, सुमुखी, संमोहिनी, चंडमातंगी, वश्यमातंगी, कर्णमातंगी, तैलमातंगी इ. प्रकार व उपासना भेद आहेत.
फल -
हिच्या उपासनेने वाचासिद्धि, कवित्वलाभ, वेद-वेदांत, ज्योतिष, संगीतविद्या आदि प्राप्ती होते व भक्तांच्या शत्रूचा नाश होतो, ही सर्वकामनासिद्ध करणारी देवता आहे.
आधार लेखन -
वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी, कोल्हापूर
आजची पूजा श्रीपूजक पुरुषोत्तम ठाणेकर, उमेश उदगावकर, संतोष जोशी व अवधूत गोरंबेकर यांनी बांधली.