ताराबाई राणीसाहेबांचे पश्चिमाभिमुखी पाषाण मंदिर

Go to content

ताराबाई राणीसाहेबांचे पश्चिमाभिमुखी पाषाण मंदिर

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Sourabh Mujumdar in History of Kolhapur · Friday 30 May 2025
Tags: TarabaiRanisahebMaharaniTarabaiTararani
लेखमाला : पंचगंगेच्या काठावरची श्रद्धास्थाने (भाग : ५)

ताराबाई राणीसाहेबांचे पश्चिमाभिमुखी पाषाण मंदिर

बुवासाहेब महाराज यांना आठ महाराणी होत्या. त्यापैकीच एक म्हणजे जोत्याजीराव पाटणकर यांची कन्या आनंदीबाई उर्फ ताराबाई होय. बुवासाहेब महाराजांच्या निधनानंतर पाच राणीसाहेब, तीन सुपुत्र ,व दोन सुकन्या असा परिवार होता.त्यापैकीच एक बाबासाहेब महाराज म्हणजे बुवासाहेबांचे युवराज शिवाजी महाराज अर्थात आनंदीबाई उर्फ ताराबाई राणीसाहेब यांचेही सुपुत्र होय. १८ डिसेंबर १८३० रोजी जन्मलेल्या बाबासाहेब महाराज यांचे वय अवघे आठ वर्षांचे तर ताराबाई राणीसाहेबांचे वय त्यावेळी ३३ वर्षांचे होते.
       ताराबाई राणीसाहेबांसोबत त्यांच्या वतीने जीवराव जाधव व मोरोपंत हुजूरबाजार राज्यकारभार पाहत असत. ताराबाई राणीसाहेबांनी दरबारातील कामकाजांची विभागणी सुद्धा मोठ्या कौशल्याने केलेली होती. ज्यामध्ये जमाखर्च- हिम्मतबहाद्दर चव्हाण, लष्कर- हणमंतराव निंबाळकर , खर्डेकर सरलष्कर, न्यायाधीश- दादासाहेब जोशीराव, व श्री शंकराचार्य -पंडितराव, पत्रव्यवहार- श्रीपतराव पारसनीस, चिटणीस- बळवंतराव हंबीरराव, पागा व पिलखाना- बुवासाहेब सरनोबत व आबासाहेब जाधव, जामदारखाना- आबाजीबुवा हुजरे अशी कामाची विभागणी होती.
     या ताराबाई राणीसाहेब इ.स. १८५३ मध्ये आजारी पडल्या व कालवश झाल्या. त्यामुळे त्यावेळी राजघराण्यात वडीलधारी ज्येष्ठ असे कदाचित कोण नसावे. या ताराबाई राणीसाहेबांचे समाधी मंदिर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ छत्रपती बाबासाहेब महाराजांनी पंचगंगा नदी घाटावरील संस्थान शिवसागर येथे बांधले. पाषाण बैठी मूर्ती स्वरूपातील हे समाधी मंदिर त्यांचे पती बुवासाहेब महाराजांच्या समाधी मंदिरासमोरच पश्चिम दिशेला तोंड करून उभे आहे.

ब्रिटिश अधिकारी वॉडबायचे दुर्मिळ तैलचित्र

याच मंदिराचे एक अत्यंत सुंदर रंगीत दुर्मिळ तैलचित्र २० डिसेंबर, १८५८ रोजी एका ब्रिटिश लष्कर अधिकाऱ्याने काढलेले पहावयास मिळते. हा अधिकारी म्हणजे सिडने जेम्स वॉडबाय होय. इस १८५८ च्या डिसेंबर महिन्यामध्ये तो कोल्हापुरात आला . केवळ पाच ते सहा महिने अत्यंत अल्पकाळासाठी येथे असूनही त्याने रेखाटलेली काही चित्रे आजही तत्कालीन कोल्हापूर डोळ्यासमोर उभे करते. त्यापैकीच हे मौल्यवान चित्र आहे. सुबक, देखणे असे हे छोटेसे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. मंदिरावर चुना व वीट बांधकामातील शिखर असून पुढील दोन्ही बाजूला अलंकार घातलेले गजराज असून त्यावर माहुत देखील आरूढ झालेले आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते या समाधी मंदिराचे हुबेहूब काढलेले हे रंगीत तैलचित्र ऑस्ट्रेलिया मधील सिडनी येथील एका संग्रहालयात आहे असे समजते.
_________________

तैलचित्रा खालील वैशिष्ट्यपूर्ण मजकूर

या चित्राखाली या चित्रकाराने कर्सिव्ह अशा प्रवाही व इंग्रजी लिपीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मजकूर दोन ओळींमध्ये लिहिलेला असून छत्रपती शाहू विद्यालयातील संगणक शिक्षिका सौ. विनिता शानभाग यांच्या सहकार्याने त्याचे वाचन केले असता सुंदर माहिती उजेडात आली. ती खालील प्रमाणे :

" Tomb to the mother of the present raja of kolhapur in the burial Ground near the river sketched Dec.20.1858 "

" २० डिसेंबर १८५८ रोजी रेखाटलेले नदीकाठी असलेल्या  स्मशानभूमीतील कोल्हापूरच्या विद्यमान राजांच्या आईची समाधी "
_________________


Back to content