पंचगंगा घाटावरील प्राचीन श्री तारकेश्वर मंदिर
Published by Sourabh Mujumdar in History of Kolhapur · Friday 13 Jun 2025
Tags: तारकेश्वर, मंदिर, पंचगंगा, घाट
Tags: तारकेश्वर, मंदिर, पंचगंगा, घाट
पंचगंगा घाटावरील प्राचीन श्री तारकेश्वर मंदिर
सौरभ मुजुमदार,
कोल्हापूर
पंचगंगेच्या घाटावर संस्थान शिवसागरच्या मुख्य दगडी कमानी मधून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तटबंदीच्या आत असणारे पूर्वाभिमुख भक्कम पाषाण मंदिर म्हणजेच श्री शंभू तारकेश्वर होय. नदी काठावरील अत्यंत प्राचीन असणारे हे मंदिर कालांतराने दगडी तटबंदीच्या आतमध्ये गेले. करवीर महात्म्य, गुरुचरित्र, तसेच अनेक प्राचीन ग्रंथ व ऐतिहासिक कागदपत्रे यामध्ये नोंद असणारे हे मंदिर साधारण अकराव्या शतकातील असावे असे अभ्यासाकांचे मत आहे.
अध्यात्मिक महत्त्व
शिवगौरी करवीरास आले असता, त्यांना शिवाने करवीर क्षेत्र महिमा सांगितला ते ऐकून गौरी म्हणाली "इथले क्षेत्र महात्म्य काशीसारखेच आहे. फक्त या ठिकाणी काशीप्रमाणे तारकमंत्र नाही इतकेच या ठिकाणी होणे आहे. तरी आपण या ठिकाणी निरंतर वास करून इथल्या भक्तांना तारकमंत्र द्यावा "ते ऐकून भगवान शिव म्हणाले, "या स्थानि केवळ जगदंबेचे दर्शन अथवा त्रिकाळ आरती पाहण्यानेच मुक्ती मिळते. यासाठी वेद, शास्त्राध्ययन, तप, मौन, ध्यान, उपदेश अशांची काहीही आवश्यकता नाही." परंतु गौरीचा आग्रह पाहून शिवांनी जगदंबेची आज्ञा घेऊन श्री तारकेश्वर नावाने पंचगंगेच्या काठावरच कायमचा निवास केलेला आहे.
या वास्तव्याबरोबरच जगदंबेने शिवांना आपल्या उजव्या हातास काशी विश्वेश्वर नावाने विशेष स्थान दिले व या ठिकाणी आपण माझ्या भक्तांना तारकमंत्र देत नित्य रहावे अशी आज्ञा केली. हेच नदी काठावरील प्राचीन श्री तारकेश्वर मंदिर होय.( वेदमूर्ती श्री सुहास जोशी, गुरुजी यांच्या संग्रहातून ).
श्री शंभू छत्रपतींची सनद
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची मूळ मूर्ती श्री शंभू छत्रपतींच्या आज्ञेनुसार मूळ मंदिरात पुनःस्थापित झाली. याबरोबरच छत्रपतींनी अनेक इतर मंदिरांनांही सनदा दिल्या. त्यापैकीच श्री तारकेश्वर देवाची पूजा अर्चा व व्यवस्थेसंबंधीची सनद देखील इ.स. १७४० ला मुजुमदार घराण्याला दिली. सध्या या देवाच्या सेवेत या घराण्याची दहावी पिढी अखंडपणे कार्यरत आहे.
स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असणारे शिल्प वैभव
सहा फुटांचे लांब पाषाण असणारे भक्कम भिंती असणाऱ्या या मंदिराच्या शेजारील डावीकडचा छोटासा घाट श्री तारकेश्वर घाट म्हणून नोंद आहे. गर्भगृहातील शिवलिंग हे अत्यंत प्राचीन व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पांढऱ्या स्फटिका प्रमाणे नर्मदेच्या नदीपात्रात सापडणारे बाणलिंगच आहे असे अभ्यासकांचे मत आहे.या बाणलिंग स्वरूपातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शिवलिंगाच्या बरोबर वरच्या बाजूस छतावर १६ कमळ पाकळ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण शोडषदशकमल असे वितान आहे. मंदिरात ठिकठिकाणी वेलबुट्टी, पतंग,फुले अशा पाषाणातील कोरीव आकृती आहेत. सूर्यास्तावेळी सूर्याची सोनेरी किरणे पश्चिमेकडील पाषाण झरोक्यामधून शिवलिंगावर येतात. दरवर्षी येणारा महापूर त्यामुळे साठणारी माती व घनकचरा, चुन्याची रंगरंगोटी यातून या मंदिराला काही वर्षांपूर्वी स्वच्छता व साफसफाई करून पाषाणातील नैसर्गिक मूळ स्वरूप प्राप्त झालेले आहे.
करवीर चा रक्षणकर्ता म्हणून पंचगंगा नदी घाटावर विराजमान झालेल्या श्री तारकेश्वर मंदिरात कित्येकदा एखाद्या तरी श्रावण सोमवारी नदीचे पाणी शिवलिंगावर येते.
दगडी तटबंदीच्या आत दडलेल्या या श्री शंभू तारकेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला हजारो भक्त हजेरी लावत असतात.



_______
फोटो -
१) संस्थान शिवसागर समाधी परिसरातील श्री तारकेश्वर मंदिर
२) मंदिराच्या गर्भगृहातील पांढरे शुभ्र स्फटिकरुपी शिवलिंग
३) वेलबुट्टी, पतंग, फुले, चक्र अशा मंदिरातील कलाकृती