आजची करवीर निवासिनी - त्र्यंबोली भेट
Published by Prasanna Malekar in Festivals in Mahalaxmi temple Kolhapur · Saturday 27 Sep 2025
आज अश्विन शुद्ध पंचमी दिनांक २७ सप्टेंबर २०२५. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची गजारूढ पूजा साकारण्यात आली आहे.
करवीर माहात्म्यातील कथेप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूर वध करताना आई अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले होते की या नगरीला तुझे नाव राहील. दरवर्षी तुझ्या नावाने कोहळा बळी दिला जाईल आणि या क्षेत्राला गयेचे पावित्र्य मिळेल. त्याला अनुसरून देवी कोहळा फोडण्याचा सोहळा आपल्या मुक्ती मंडपात करत असे.
पुढे कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने कपिलमुनींकडून योगदंड मिळवून महालक्ष्मी सह सर्व देवतांचे रूपांतर बकऱ्यामध्ये करून दिले. त्यावेळेला मांगले गावच्या भार्गव आणि विशालाक्षी या दांपत्याची कन्या असणारी, त्रिकाळ पाण्यामध्ये राहून देवीच्या सुवर्ण कमळाचे रक्षण केले म्हणून त्र्यंबोली नावाने ओळखली जाणारी सखी कुबेराच्या पुत्राकडे कोहळा फोडण्याच्या विधीसाठीचे साहित्य आणायला गेल्याने वाचली होती. तेव्हा नारदा कडून तिला या गोष्टीची बातमी कळतात तीने चतुराईने कामाक्ष दैत्याकडून योगदंड काढून घेतला आणि त्याचेच रूपांतर बकऱ्यांमध्ये केले. त्यानंतर महालक्ष्मी सह सर्व देवांची मुक्तता केली.
या आनंदात देव त्र्यंबोलीला विसरले म्हणून त्र्यंबोली रागाने शहराबाहेरच्या टेकडीवर येऊन शहराकडे पाठ करून बसली. तेव्हा अंबाबाई देवांसह तिच्या भेटीला आली आणि तिने तिला वरदान दिले की आज पासून तू या क्षेत्राची संरक्षक देवता आहेस. जो कोणी व्यक्ती तुला सांगितल्या वाचून पुण्य कर्म करेल तर त्याचे पुण्यफल घेण्याचा अधिकार तुझा असेल. याखेरीज जो कुष्मांडभेदनाचा सोहळा माझ्या मुक्ती मंडपात होतो तो यापुढे तुझ्यासमोर होईल. मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईन. या वरदानाला अनुसरून आज करवीर निवासिनी त्र्यंबोली भेटीसाठी गेली.
देवी आणि त्र्यंबोली यांची भेट झाल्यानंतर गुरु महाराज आणि त्यानंतर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि यौवराज शहाजीराजे श्रीमंत यशराज राजे यांनी त्र्यंबोलीचे दर्शन घेऊन आरती केली. मंडपात असलेल्या गुरव पुजारींच्या घरातील कुमारीकेची पूजा केली आणि बावडा गाव कामगार चावडीच्या त्रिशूलाने कोहळा फोडला. आज उत्साहात हा सोहळा पार पडला.
श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः