करवीर निवासिनीची वरदलक्ष्मी व्रतपूजा

Go to content

करवीर निवासिनीची वरदलक्ष्मी व्रतपूजा

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
करवीर निवासिनीची वरदलक्ष्मी व्रतपूजा
सुवर्ण अलंकाराऐवजी तुळस, बेल, केवडा आदिंचा पूजेमध्ये वापर

कोल्हापूरची श्री महालक्ष्मी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक पूर्ण पीठ असल्याने या नगरीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. काही तिथींना येणारी देवीची व्रते महत्त्वपूर्ण मानली जातात. परंतु या सर्वांपेक्षा वेगळे असे महत्त्वपूर्ण व्रत म्हणजेच "वरदलक्ष्मी व्रत" होय.

प्राचीन काळी शौनक ऋषींनी नैमिष अरण्यात सुताला विचारलेल्या प्रश्नात ही चर्चा झाल्याचे उल्लेख आढळतात. पुराण सांगणारे (सूत) यांनी त्या वेळी पार्वतीने शंकराला विचारल्यावर हे व्रत सांगितल्याचे पौराणिक उल्लेख आहेत. श्रावण महिन्यातील शुक्रवारी अथवा श्रावणी पौर्णिमे जवळ येणाऱ्या शुक्रवारी हे व्रत केले जाते. या व्रतात लक्ष्मी देवतेची चतुर्भुज मूर्ती घेऊन वेगवेगळ्या २१ जातीच्या पल्लवांनी (पत्री अथवा झाडांची पाने) पूजा करतात.

अंबाबाई मंदिरात श्रावण मासातील शुक्ल पक्षात पौर्णिमेच्या जवळच्या येणाऱ्या शुक्रवारी देवीची या व्रताची पूजा साकारली जाते. श्रीपूजकांपैकी प्रतिनिधींच्या हस्ते पौर्णिमेच्या जवळच्या शुक्रवारी मंदिरात ही प्राचीन परंपरा आजही सुरू आहे. देवीच्या इतर विधींसोबतच या पूजेचे पौरोहित्यही पंचांगकर्ते लाटकर या घराण्याकडे आहे.

या दिवशी आई अंबाबाईचे नित्याचे सकाळचे धार्मिक विधी आटोपल्यानंतर केवळ याच दिवशी देवीची दुपारची अलंकार पूजा बांधली जात नाही. वरदमहालक्ष्मी व्रताची पूजा सूर्यास्ता वेळी चालू होते. देवीच्या मुख्य गर्भगृहात हि पूजा तीन तास चालते. यामध्ये देवीचे स्वतंत्र पीठ मांडावे लागत नाही. कारण करवीर निवासिनी महालक्ष्मी हे साडेतीन पीठापैकीच असल्याने स्वतंत्र पिठाची आवश्यकता नसते. यामध्ये देवीच्या १००८ नामांचे स्मरण केले जाते व देवीला तुलसी पत्र, बिल्व पत्र ,पल्लवपत्री यांसह केवडा आदि पत्रींचा वापर केला जातो. तसेच दशतंतूंचा दोरा, काळा, लाल, पिवळा, आदि विविध रंगांचे रेशमीतंतुयुक्त दोरे हातात बांधले जातात. केवळ याच दिवशी देवीची सुवर्ण अलंकार पूजा नसल्याने अनेक भक्तांना याबाबत उत्सुकता असते.

या पूजेनंतर देवीचे दिव्यस्वरूप व दैदिप्यमान रूप पाहून मन खरोखर प्रसन्न होते. यावेळी देवीला वस्त्र परिधानानंतर वस्त्र कार्पासमणी (कापसाचे वस्त्र) व गेजवस्त्र  तसेच केवडा यांनी सुंदर सजविले जाते. देवीचा पूजा विधी पूर्ण झाल्यावर नेहमीप्रमाणे धुपारती, पंचारती ,महानैवेद्य व कापूर आरती होऊन शंखतीर्थ शिंपडले जाते. रात्री साडेनऊ वाजता देवीचा दर शुक्रवारी होणारा नित्य पालखी सोहळा हा देखील तेवढ्याच उत्साहाने त्या दिवशी पार पडतो.


आज शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी होणार वरद महालक्ष्मी व्रताची पूजा

वरद महालक्ष्मी हे दांपत्याने करावयाचे काम्यव्रत असून लक्ष्मीचा वरदहस्त रहावा यासाठी हे केले जाते. श्री सूक्ताची २१ आवर्तने त्याचबरोबर अंबाबाईला जलाभिषेक व तुळशी पाने, फुले, केवडा, व कमळ यांचा वापर करून देवीची वैशिष्ट्यपूर्ण पूजा साकारली जाते. यावर्षी ही पूजा शुक्रवार दि., ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी होणार आहे.

- सौरभ मुजुमदार, कोल्हापूर
छायाचित्र सौजन्य - श्री. संजय साळवी, कोल्हापूर.


Back to content