आज कुर्म अवतार जयंती

Go to content

आज कुर्म अवतार जयंती

Mahalaxmi Temple Kolhapur | Website by Ambabai devotees
Published by Umakant Raninga in Mahalaxmi Ambabai temple premises · Friday 01 May 2026
Tags: KurmaAvatarJayanti
आज कूर्म अवतार जयंती

ॐ नमो भगवते कूर्माय महाबलाय दिव्याय
शेषपर्यङ्कशायिने नीलकण्ठाय नमो नमः

भगवान विष्णूंच्या दशावतार संकल्पनेत कूर्म अर्थात कासव हा दुसरा अवतार मानला गेला आहे. प्रथम अवतार मत्स्य हा जसा चंचलतेचं प्रतीक आहे, तसा कूर्म हा स्थिरतेचं धैर्याचं प्रतीक मानला जातो. पृथ्वीवर जीवसृष्टीच्या उत्क्रांती क्रमात पण जलचर नंतर पहिला उभयचर जीव म्हणजे कूर्म. समुद्र मंथन करताना मंदार पर्वताला स्थिर ठेवण्यासाठी विष्णूनी कूर्म रूप धारण केले अशी पुराणकथा आहे, तर यमुना नदीचे वाहन म्हणून पण कूर्म दाखवला जातो.  सृष्टीतील सजीवात कूर्म हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून तर त्याला दशावतारात स्थान दिले गेले आहे. वैशाख पौर्णिमेस कूर्म जयंती साजरी केली जाते.

कासवाच्या जीवनशैलीचा अभ्यास करून मानवी जीवनात त्याचा कसा उपयोग होईल याचा विचार आपल्या ॠषी मुनींनी केला आहे. श्री विद्येच्या उपासनेत  श्री यंत्राची अचूक रचना कूर्म पृष्ठ प्रकारातच होऊ शकते. तर पतंजलीच्या योगसूत्रात कूर्म नाडीचा उल्लेख येतो. तर अध्यात्म शास्त्रात कासव संकटकाळात आपले चारी पाय ,मुख आणि शेपूट आंत घेऊन निश्चल राहते याचा संदर्भ घेऊन मानवाने पण संकटकाळात स्थिर रहावे असा संदेश दिला आहे.

मंदिरात कासवाच स्थान हे पण अध्यात्मिक मार्गदर्शनच आहे. देवदर्शन करतांना अंतर्मन एकाग्र असणे आवश्यक असते हे दाखवण्यासाठी मंदिरात कासव असते. कासवाची मादी अर्थात कासवी आपल्या पिलावर जशी दूर अंतरावरून पण नजर ठेवून असते तसेच ॐ कार गणेश आपल्या भक्तांना कृपा दृष्टी ठेवतो.

अखिल जीवसृष्टीवर अनंत उपकार असलेल्या या अवतार देवतेला त्याच्या जयंतीनिमित्त वंदन करूया.

**श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील ईशान्य कोपऱ्यात, म्हणजे रामाच्या पराच्या पाठीमागील कोपऱ्यात दशावतार मंदिर आहे. या मंदिरात विष्णू दशावताराच्या आकर्षक मूर्ती आढळतात.

या पानावर मंदिर परिसराचा नकाशा उपलब्ध असून क्र. ५२ येथे दशावतार मंदिर आहे.

-
उमाकांत राणींगा, कोल्हापूर.


Back to content