श्री कुकूटेश्वर - दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Go to content

श्री कुकूटेश्वर - दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री कुकूटेश्वर - दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थानमहात्म्य लाभलेले टाऊन हॉल येथील श्री महादेव मंदिर म्हणजे श्री कुकूटेश्वर- महादेव मंदिर. कोल्हापुरातील टाऊन हॉल बाग हा करवीरकरवासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध प्रजातीची झाडे, वृक्ष, पक्षी संपदा जपलेलं ठिकाण. कोल्हापूरच्या अतिप्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे ठिकाण म्हणजे ब्रह्मपुरी टेकडी. या टेकडीच्या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळालेल्या वस्तू संग्रहित स्वरूपात या टाऊन हॉल बागेत ठेवलेल्या आहेत. संस्थान कारकिर्दीत भव्य इमारत उभा करून कोल्हापूर वस्तुसंग्रहालय रूपाने आजही हे वस्तुसंग्रहालय नाममात्र शुल्क दरात पहावयास मिळते.

पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन तसेच उद्यान विभाग यांच्या अखत्यारीत आज हा भाग असला तरी येथे प्राचीन धार्मिक स्थान महात्म्य दर्शवणारे शिवमंदिर ही दिसून येते. निसर्गरम्य झाडी आणि यामध्ये असणारे हे शिवमंदिर मनास विलक्षण गारवा देणारी अनुभूती देते. मोठमोठाले वृक्ष आणि त्यांच्या छायेत एकत्र येऊन सामाजिक आंदोलने, मोर्चेकरी, नाट्यकर्मी, रंगकर्मी अशा सर्वांसाठीच आपुलकीचे ठिकाण म्हणजे ही टाउनहॉल बाग होय. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी ही स्थानिक क्रांतीकारकांना एकत्र येण्यासाठी ही बाग प्रेरणादायी ठरली होती. आणि या सर्वांसाठी प्रेरक ठरणारा कणा म्हणजे हे प्राचीन शिवमंदिर. जुने मंदिर हे खूपच मोडकळीस आल्याने श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज करवीर यांच्या कारकिर्दीत मे. विश्वासराव पाटील प्रेसिडेंट इलाखा पंचायत करवीर संस्थान करवीर यांनी सध्या दिसणारे हे मंदिर बांधलेले आहे.

मंदिर पंधरा बाय पंधरा आकारातील दगडी बांधीव असून शिखर चुनाभट्टी बांधकामातील कोरीव शैलीतील आहे. मंदिरा सभोवती सात फूट आकाराने पत्र्याचे शेड वजा मंडप आहे. यामध्ये मंदिरासमोर श्री नंदी मूर्ती विराजमान आहे. या मंडपासमोर अलीकडील काळात चाळीस बाय चाळीस आकारातील पत्र्याची शेड उभा करून मंडप उभा केला आहे. मधोमध एक मोठे वृक्ष त्याला दगडी कट्टा तेथेही समाधिस्थान पादुका असल्याने कोणी बसू नये म्हणून तिरकस सिमेंट लादीकट्टा बांधला आहे. येथे दगडी मोठ्या चौरंग आकारातील कूर्म स्वरूपातील पादुका स्थानही आहे. येथे अनेक दगडी शिल्प विखुरल्याच्या स्थितीत दिसून येतात. या झाडाच्या समोरच दीड बाय तीन फूट खांब आकारातील जुना शिलालेख आहे. पण तोही भगव्या रंगाने रंगवल्या मुळे दिसून येत नाही. या मडंपा सभोवती काडापा फरशी बसवुन कट्टा केल्यामुळे भक्तगण, निराधार, कष्टकरी या सर्वांसाठी थोडी उसंत मिळण्याचे ठिकाण बनले आहे. पुराण संदर्भ ग्रंथांचा विचार करता कोल्हापुरात कोटीतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ आहेत या प्रमाणेच हे ठिकाण म्हणजे यमतीर्थ आहे.                                         
असे हे दक्षिण काशी, क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले शिवमंदिर म्हणजे श्री कुकूटेश्वर- महादेव मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.

Facebook Link : https://www.facebook.com/udaysinh.rajeyadav.1


Back to content