श्री नागनाथेश्वर - दक्षिण काशी, क्षेत्र करवीर

Go to content

श्री नागनाथेश्वर - दक्षिण काशी, क्षेत्र करवीर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री नागनाथेश्वर - दक्षिण काशी, क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले नागाव येथील श्री महादेव मंदिर म्हणजे श्री नागनाथेश्वर महादेव मंदिर, नागाव. कोल्हापूर पासून पुलाची शिरोली मार्गे राष्ट्रीय महामार्गावरील दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील गाव. महामार्गावरून दोन किलोमीटर अंतर रस्ता फाट्याने मुख्य गावात यावे लागते. गावच्या मधोमध दीडशे वर्षांपूर्वीचा गाव चावडी वाडा लागतो. या लगतच हे श्री नाग स्थान आहे. गावचे ग्रामदैवत हे श्री खणाई देवी असले तरी नागाचे विषकुंड स्थान यामुळेच गावाला नावही नागाव असे पडले आहे.

करवीर महात्म्य या प्राचीन ग्रंथातील तेराव्या अध्यायात नागावर श्री महालक्ष्मी कशी प्रसन्न झाली याचे सविस्तर वर्णन आहे. नागांनी विविध स्तुतिस्तोत्रे गायिली. ती आजही म्हणली जातात. नागांनी देवीचे मनोभावे स्तवन केले. देवीचे साग्रसंगीत पूजन केले. गंध, अक्षता, धूप, दीप, पुष्प, बिल्वपत्रे, निरांजन, वस्त्रालंकार, सुगंधी द्रव्ये, सुवर्णपुष्पे, तांबुल आदींनी तिची पूजा केली. होमहवन केले. देवीची नम्र भावे प्रार्थना केली. हे श्री महालक्ष्मी देवी तुझ्या दर्शनाने आमचा जन्म धन्य झाला आहे. आता आम्हास कोणतेही दुःख नाही. तुझ्या क्षेत्रात निवास करण्यास अनुभूती मिळावी एवढीच आमची इच्छा आहे. परंतु अजूनही आम्हास गरुडा पासून भय आहे. त्या भयापासून तू आम्हास मुक्ती दे म्हणजे तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्हाला राहता येईल. कृपावंत झालेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली, "हे नागानो, महामुनी पराशर यांच्या संगतीने तुम्ही खरोखरी पावन झाला आहात. आज मी तुम्हाला गरुडाच्या भयापासून मुक्त करते. आज तुम्ही निर्भय झाला आहात. या क्षेत्राची तुम्ही आनंदाने यात्रा करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रहाल त्या त्या ठिकाणी तुमची तीर्थ होतील. यात्रा मार्गात ज्या ज्या ठिकाणी तुमचे विष पडेल त्या ठिकाणी तुमच्या नावाची स्थळे होऊन प्रसिद्धीस पावतील".

नागनाथाचे विष पडले म्हणून म्हणून या गावास नागाव हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. नागांनी या ठिकाणी राहून महादेवांचे नामस्मरण केल्यामुळे श्री शंकर प्रसन्न झाले. ते नागास म्हणाले "तु या क्षेत्री राहून महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने धन्य झाला आहेस. तुला काही उणे नाही तरी ही तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तू इच्छित वर मागुन घे." नाग म्हणाले हे उमापती तू या ठिकाणी शैलाग्री निवास करावास. या गावातील गाव चावडी जवळ श्री नागनाथाचे मंदिर आहे आणि यामंदिराशेजारीच हे श्री नागनाथेश्वर मंदिर आहे. गाव चावडी जवळील नागाचे स्थान असणारे प्राचीन श्री नागनाथ महादेव मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून वीस बाय दहा गर्भगृह तर वीस बाय तीस नंदीमंडप, तर कमळ पाकळ्या स्वरूपातील उंच शिखर, मार्बल फरशीसह चकचकीत असे आर. सी. सी. मंदिर उभारले आहे. गर्भगृहात सुंदर शिवलिंगासह दगडी नाग शिल्प प्रतिमा तर अन्य पितळी नागप्रतिमा दिसून येतात. येथील नंदी मूर्ती ही सुंदर आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर गावकरी, शेतकरी आपल्या शेतात पिकलेली पिके प्रथम देवास अर्पण करतात. आता सध्या ऊस शेती असल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतातील ऊस दसऱ्याला अर्पण करतात. नंदीमंडपात हे ऊस ठेवले जातात. नंतर ते प्रसाद स्वरुपात वाटले जातात. या मंदिरा शेजारी रस्त्यापलीकडे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. तर या नागनाथ मंदिर रस्त्याच्या मार्गावरच पाच-सहा घरे सोडल्यानंतर रस्त्याशेजारीच श्री नागनाथेश्वर मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीतील प्राचीन असून बारा बारा दगडी एकपाकी कासव पाठीचे शिखर असणारे आहे. मंदिराबाहेरील श्री नंदी मूर्ती ही खूप सुंदर आहे. जिल्हा परिषद, कोल्हापूर ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत परिसरात पेविंग ब्लॉक- सिमेंट ठोकळे बसवत, मंदिराची डागडुजी, सिमेंट ने दर्जा भरणे अशा बाबी करत परिसर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरातील शिवपिंडी अतिशय कोरीव, सुबक, आकर्षक आहे.

असे हे, दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले नागाव येथील श्री नागनाथेश्वर- महादेव मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.

Facebook Link : https://www.facebook.com/udaysinh.rajeyadav.1


Back to content