दुर्गाशक्ती - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content

Main menu:

'नव'दुर्गांची ओळख करून घेऊया श्री. विनीत वर्तक यांच्या लेखणीतून.
श्री. विनीत वर्तक यांच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

दुर्गाशक्ती (भाग ४)

अवकाशाची स्वप्न प्रत्यक्षात जगणारी पहिली मराठी स्त्री अनिमा पाटील-साबळे.आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक स्वप्न बघतो. त्यांचा पाठलाग करतो. पण सगळीच सत्यात येतात असं होतं नाही. आपण थांबतो. वाटते वय झालं, आता वेळ नाही , जमणार नाही, कोणी मदत करत नाही. पण ह्या पलीकडे स्वप्न बघून त्याचा पाठलाग करणारे थोडेच असतात. महाराष्ट्रातल्या जळगाव मधून एका छोट्या शाळेत शिक्षण घेताना ७ वर्षाच्या अनिमा ने अवकाशात भरारी घेण्याची स्वप्न बघितलं. एका पुस्तकांच्या प्रदर्शनात अमेरिका आणि रशिया च्या अवकाशयात्रीचे फोटो असलेलं एक पुस्तक हाताला लागलं आणि अनिमा ने ते बघताच आपल्या आयुष्याच लक्ष्य ठरवलं. त्याच काळात भारताचे राकेश शर्मा रशियन रॉकेट मधून अवकाशात जाऊन आले होते. तेच अनिमा चा आदर्श ठरले. एक दिवस मी पण असाच सूट घालून ह्या अवकाशात विहार करेल अस अनिमा नी नक्की केलं. सगळे नातेवाईक शिकून काय करणार? पुढे जाऊन तर लग्न करून संसार थाटायचा आहे अस बोलत असताना अनिमा ने आपल्या स्वप्नांची साथ सोडली नाही.
अवकाशाला गवसणी घालण्यासाठी गरज होती ती पायलट बनण्याची म्हणून अनिमा ने फायटर पायलट बनण्याचा निश्चय केला. त्याकाळी हे क्षेत्र महिलांना खुले नव्हतं तसेच अजून एक अडचण तिच्यासमोर होती ती म्हणजे स्त्री म्हणून नाही तर तिच्या डोळ्याचं व्हिजन हे २०-२० नव्हतं. अनिमा ची सगळी स्वप्न एका क्षणात तुटली. पुढे काय कराव हे कळत नसतांना, वडिलांनी एम सी ए ला अर्ज करण्याचा सुचवलं पण हे हि सांगितलं कि हा ३ वर्षाचा कोर्स आहे, तुला लग्नासाठी स्थळ येत आहेत. जर एखादा स्थळ पसंत पडला तर तुझी डिग्री पूर्ण होईल याची खात्री नाही. तेव्हा आईने मध्यस्ती केली आणि अनिमा ची साथ देत त्या म्हंटल्या ती हुशार आहे स्मार्ट आहे, करू द्या तिला एम सी ए आपण तिच्या होणाऱ्या सासरच्यांना विनंती करू तिला शिक्षण पूर्ण करु देण्यासाठी. अनिमा नेे मास्टर इन कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं पदवी शिक्षण सुरु केलं, ते करत असतानाच कॉलेज मध्ये तिला एक वर्ष सिनियर असणाऱ्या दिनेश यांनी तिच्यासाठी मागणी घातली. घरच्यांच्या संमतीने अनिमाने आपला जोडीदार म्हणून निवडलं.
लग्नानंतर अनिमा आणि दिनेश मुंबईत येऊन जॉब करू लागले. मुंबई मधून त्यांना अमेरिकेत जायची संधी मिळाली. मार्च २००० मध्ये अनिमा अमेरिकेत आल्यावर आपला सॉफ्टवेअर मधला जॉब करीत असताना अनिमा च्या मनात असलेल स्वप्न तिला शांत झोप लागू देतं नव्हतं. आकाशाला गवसणी घालण्याच जे स्वप्न तिने लहानपणी बघितलं ते कुठेतरी अजूनही सतत तिला अस्वस्थ करतं होतं. आपल्या घराच्या जवळच नासा च एक केंद्र तिला दिसलं आणि पुन्हा तिच्या स्वप्नाला नवीन धुमारे फुटले. आपला जॉब करत अनिमा ने एरोस्पेस इंजिनिअरींग ला प्रवेश घेतला. तेव्हा अनिमा ३ वर्षाच्या एका बाळाची आई झाली होती. कोणालाही हे वाचताना अचंबित होईल की एक ३ वर्षाच्या मुलाची आई कॉलेज ला जात होती. पण सकाळी ४ ला उठून घरातलं सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत अनिमा ने आपलं शिक्षण पुन्हा सुरु केलं. कॉलेज चालू असताना तिने नासा आणि लॉकहिड मार्टिन मध्ये नोकरीसाठी अर्ज देणं सुरु ठेवलं होत. पण अमेरिकन नागरिक नसल्याने तिला तिकडे प्रवेश मिळाला नाही. पण तिने हार मानली नाही. तिच्या शब्दात
It is okay to go slow but giving up is never an option if you want to fulfill your dreams.
तिचं मास्टर होईपर्यंत अनिमा दुसऱ्या बाळाची आई झाली होती. एक आई, बायको, नोकरी करणारी स्त्री आणि एक विद्यार्थी अश्या सगळ्या भूमिकेतून वावरताना तिने आपलं शिक्षण चांगल्या मार्काने पूर्ण केलं. २०१० मध्ये तिचं शिक्षण संपल आणि तिने नासा मध्ये काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण सुरु केलं. तिच्या प्रयत्नांना २०१२ मध्ये यश आलं जेव्हा नासा मधून केपलर मिशन साठी प्रिंसिपल इंजिनिअर म्हणून तिची निवड झाली. त्यावेळेस अनिमा अमेरीकेच नागरिकत्व ही मिळालं. अनिमा ने ह्या जॉब सोबत नासा आणि केपलर मिशन बद्दल माहिती सांगायला सुरवात केली. थोड्याच दिवसात अनिमा तिथल्या मुलींसाठी रोल मॉडेल ठरली. अनिमा ची निवड नासा च्या दोन एनेलॉग मिशनसाठी कमांडर म्हणून निवड झाली. चंद्र, मंगळ किंवा इतर कोणत्या ग्रहावर अंतराळवीर कसे राहतील? त्यांना कोणत्या अडचणी येतील ह्याच्या अभ्यासासाठी झालेल्या मिशन मध्ये त्यांची निवड झाली होती.
NASA’s Human Exploration and Research Analog in 2015 and a Martian analog at the Mars Desert Research Station in 2018.
अश्या प्रकारच्या मोहिमेत समावेश होणे हे अंतराळवीर बनण्याच्या दृष्टीने पहिली पायरी मानली जाते. अनिमा ने नासा मध्ये काम करताना अगदी ६ जी पर्यंतच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला आहे. जो अंतराळवीर बनणाऱ्या लोकांसाठी गरजेच मानलं जाते. त्या प्रभावात काम अचूकपणे करता येण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागत असतो. ह्या सर्वात अनिमा उत्तीर्ण झाली आहे. आपलं लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणाच्या दृष्टीने तिने अजून एक पाउल पुढे टाकलेलं आहे.
अनिमा अंतराळात जेव्हा भरारी घेईल तेव्हा ती अंतराळात जाणारी जगातील पहिली मराठी स्त्री असेल. जळगाव सारख्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातून असलेल्या अनिमा ने वयाच्या सातव्या वर्षी बघितलेल्या एका स्वप्नाचा पाठलाग सुरु ठेवला. घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या आईच्या मदतीमुळे अनिमा ने आपलं शिक्षण पूर्ण केलं. नुसतचं पूर्ण केलं नाही तर ते पूर्ण झाल्यावर एक सामान्य कौटुंबिक आयुष्य जगताना पण त्या स्वप्नाची कास तिने सोडली नाही. वय झालं, वेळ निघून गेली असा विचार न करता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शक्य होईल ते अगदी प्रतिकूल परिस्थितीत ती करत गेली. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आपलं स्वप्न ही आपण जगू शकतो जे अनिमा ने भारतातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं आहे. जेव्हा गोष्टी आपल्याला मनापासून कंरायच्या असतात तेव्हा काही अशक्य नाही हे अनिमा ने सिद्ध केलं. भारतातील एका छोट्या शहरातून एका मराठमोळ्या सामान्य कुटुंबातून पुढे येतं आपल्या स्वप्नांचा पाठलाग जगातील अवकाश संशोधनात सर्वोच्च असणाऱ्या संस्थेत जिकडे काम करण हेच मुळी एक स्वप्न असते तिथे काम करून वयाच्या चाळीशीत आणि दोन मुलांची आई असूनपण आकाशात जाण्याची स्वप्न प्रत्यक्षात जगणाऱ्या दुर्गाशक्ती अनिमा पाटील- साबळे ह्यांना माझा दंडवत.
ता. क. :- हा लेख लिहताना खुद्द अनिमा पाटील- साबळे ह्यांनी अमेरिकेवरून व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून काही सूचना आणि मदत मला केली. त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
माहिती स्त्रोत :- Anima Patil-Sabale
फोटो स्त्रोत:- गुगल
#दुर्गाशक्ती (भाग ३)

भारतातील पहिली महिला रीक्क्षा चालक शिला डावरे.१८ व्या वर्षी १९८० च्या दशकात महाराष्ट्रातील परभणी येथे राहणारी एक तरुणी घरदार सोडून काहीतरी करणाच्या इच्छेने पुणे इकडे येते. हातात असलेले १२ रुपये आणि खूप सारी स्वप्न. थोड शिक्षण झालं की कधी एकदा लग्न करून मुलीला सासरी पाठवतो असा विचार करणारे अनेक पालक असतात. अस गुलामगिरीच जिवन नको म्हणून सगळ्यांना सोडून त्या काळात एका गरीब घरातील मुलीने स्वप्न बघितलं. हे अस स्वप्न बघणे हा त्या काळात गुन्हा असताना ते बघून लग्नाला आपल्या स्वप्नांच्या मध्ये न येऊ देता आपल्या पायावर उभं राहण्यासाठी पुरुषांनी व्यापलेल्या क्षेत्रात पाउल ठेवण्याच धाडस शिला डावरे ने केलं. हे पाउल तिला लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेऊन जाईल ह्याची सुतराम कल्पना शिला ला नव्हती.
१९८८ चा तो काळ होता. पुण्याच्या रस्त्यावर खाकी वर्दीतले रीक्क्षा ड्राईव्हर सगळीकडे दिसत असताना सलवार कमीज घातलेली एक तरुणी त्या गर्दीतून रीक्क्षा चालवते हे दृश्य पुणेकरांना अचंबित करणार होतं. एक स्त्री रीक्क्षा चालवते ही कल्पना मुळी कोणाच्या गळी उतरत नव्हती. शिलाला तिच्या घरातून पण विरोध झाला पण शिला आपल्या ठरवलेल्या मार्गावर चालत राहिली. पण हे सगळ सोप्प नव्हतं. घरातल्या व्यक्तींना समजवू शकतो पण बाहेरच्यांना कसं समजावणार? पाय घासून बाईक थांबवणाऱ्या अनेक स्त्रियांची दृश्य पुणेकरांना सवयीची असल्याने एका स्त्री च्या रिक्षात बसायला अनेकजण तयार नव्हते. कारण एकच होतं की आम्ही सुखरूप ठरलेल्या ठिकाणी पोहचू की नाही? अनेक नाकारांचा सामना करण्याची सवय शिलाला झाली होती.
शिलाने धीर सोडला नाही. जेव्हा नेहमीचे रिक्षावाले सुट्टी घ्यायचे तेव्हा शिलाने रीक्क्षा चालवायला सुरवात केली. हळूहळू लोकांच्या मनातील भीती कमी झाली. अनेक लोकांनी तिच्या ह्या धाडसाच कौतुक केलं. ती रीक्क्षा चालवत असताना अनेकजण थांबून कुतुहलाने तिच्याकडे बघत बसतं. तिच्या ह्या धडसामागे तिला आधार देणारे पुण्यातील काही रिक्षाचालक होते. एकदा एका हवालदाराशी शाब्दिक वादाच रुपांतर शिलावर हात उचलण्यात झालं. त्याच्या ह्या भ्याड हल्याच प्रतिउत्तर शिलाने त्याच्या कानशिलात लगावून दिल. त्याहीपुढे जाऊन त्याच्या मुजोरी ला आळा घालण्यासाठी तिने आपल्या रिक्षाचालक संघटनेची मदत घेऊन त्याला चांगला इंगा दाखवला. एक स्त्री म्हणून मागे न हटता आपल्या हक्कासाठी तिने योग्य तो लढा दिला.
१९८८ ते २००१ अशी सतत १३ वर्ष शिला रीक्क्षा, शाळेची बस, छोटा टेम्पो हे सगळं चालवून आपल्या पायावर उभी होती. वैद्यकीय कारणांमुळे शिलाला ड्राईव्हिंग सोडावं लागलं. पण शिला तिकडेच थांबली नाही. तिने अनेक स्त्रियांना ड्राईव्हिंग साठी उद्युक्त केलं. एका स्त्री ला दुसऱ्या स्त्री चा आधार जास्ती वाटतो. रात्री, अपरात्री एकटीने प्रवास करताना एक स्त्री चालक असणं त्या प्रवास करणाऱ्या स्त्री ला आश्वस्त करते हे तिने अनेकांच्या मनात रुजवलं. शिलाने आपल्या नवऱ्यासोबत एक प्रवासी कंपनी ची स्थापना केली. ह्या सगळ्या काळात तिच्या पतीने तिला योग्य ती तोलामोलाची साथ दिली.
एक सामान्य स्त्री आपल्या पायावर उभं राहण्यासाठी अश्या एका क्षेत्रात प्रवेश करते ज्याचा विचार कधी कोणी केला नव्हता. नुसती प्रवेश करत नाही तर आपल्या पायावर उभं राहून इतर स्त्रियांना त्यातून मार्गदर्शन आणि मदत करते जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील. अनेक अडचणी, अपमान आणि तिच्या कौशल्यावर संशय घेणारे ह्यांना पुरून उरत एक यशस्वी करियर घडवते. वैद्यकीय कारणामुळे लवकर निवृत्ती घेऊनसुद्धा आपल्या पुढल्या पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रीक्क्षा चालवण्याच प्रशिक्षण अकादमी काढण्याचा मानस व्यक्त करते अश्या भारतातील पहिल्या रीक्क्षा चालिकेचा बहुमान मिळवणाऱ्या दुर्गाशक्ती शिला डावरे ह्यांना माझा कुर्निसात.
माहिती स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया
फोटो स्त्रोत :- गुगल
दुर्गाशक्ती (भाग १)

भारताची अग्निपुत्री टेसी थॉमस.केरळ राज्याच्या अलापुर्र्हा ह्या गावात १९६३ ला डॉक्टर टेसी थॉमस ह्यांचा जन्म झाला. लहानपणापासून गणित आणि भौतिकशास्त्र ची आवड असणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस ह्यांच्या मनात रॉकेट विषयी जिज्ञासा जागृत केली ती जवळच असणाऱ्या थुंबा रॉकेट स्टेशनमुळे. रॉकेट कसं बनते? ते उडते कसं? ह्या सगळ्या प्रश्नांनी त्या बालमनात अनेक कुतूहल निर्माण केली होती. आई ने आपल्या बाळाचे पाय पाळण्यात ओळखले तसेच टेसीच्या ह्या आवडीला आईने प्रोत्साहन दिलं. त्रिसूर कॉलेज इकडून अभियांत्रिकी ची पदवी घेतल्यावर डॉक्ट र्टेसी थॉमस ह्यांनी आपल्या लहानपणी पडलेल्या प्रश्नांचा वेध घ्यायला सुरवात केली. त्याची उत्तर शोधताना निर्माण झालेली ओढ त्यांना पुण्याला घेऊन आली. पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवांस टेक्नोलॉजी मधून गाईडेड मिसाईल टेक्नोलॉजी मध्ये मास्टर पूर्ण केलं तसच एम.बी.ए. ऑपरेशन म्यानेजमेंट आणि मिसाईल गाईड्न्स मधून डॉक्टरेट मिळवली. अश्या वेगळ्या क्षेत्रात चमकताना एक संधी त्यांच्यापुढे आली.
१९८८ ला डी.आर.डी.ओ. ला मुलखत दिल्यानंतर नंतर त्यांना ताबडतोब रुजू होण्याचा आदेश मिळाला. आपले आदर्श डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्यांना भारताचे “मिसाईल कार्यक्रमाचे जनक” अस म्हंटल जाते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. प्रचंड अभ्यासू आणि अथक परिश्रमातून त्यांनी लवकरच सगळ्याचं लक्ष वेधलं. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी अग्नी क्षेपणास्त्राची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली. एका स्त्रीकडे भारताच्या क्षेपणास्त्राची धुरा देताना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी डॉक्ट टेसी थॉमस ह्यांच्यामधील सुप्त गुण ओळखले होते. ३००० किमी पल्ला असणाऱ्या अग्नी ३ ह्या प्रोजेक्ट च्या त्या असोसियेट डायरेक्टर त्या होत्या. तर अग्नी ५ ह्या भारताच्या ५००० की.मी. पेक्षा जास्त पल्ला असणाऱ्या क्षेपणास्त्राच्या त्या प्रोजेक्ट डायरेक्टर बनल्या.
सॉलीड प्रोपेलंट मध्ये प्राविण्य असणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी अग्नी ५ च्या निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका निभावली होती. अग्नी ५ हे क्षेपणास्त्र अतिशय वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावताना वातावरणाच्या वरच्या टप्यात जाऊन पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. ते करत असताना अतिशय वेग आणि पृथ्वीच्या वातावरणाशी होणार घर्षण ह्यामुळे तपमान हे ३००० डिग्री सेल्सिअस इतकं जात असताना क्षेपणास्त्र मधील सगळ्या प्रणाली व्यवस्थित सक्षम ठेवणारी यंत्रणा निर्माण करण्यात डॉक्टर स्टेसी थॉमस ह्याचं योगदान खूप मोठ आहे. अग्नी ५ च्या यशस्वी चाचणी नंतर आनंदाचा वर्षाव सगळीकडून होत असताना डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी पराभवाची आणि अपयशाची चव ही अनेकदा चाखलेली आहे. २००६ मध्ये अग्नी क्षेपणास्त्र आपल्या ठरलेल्या क्षमतेत पराभूत झालेलं असताना अनेक टीका अनेक क्षेत्रातून झाल्या. भारत अश्या क्षेपणास्त्रची निर्मिती स्वबळावर करू शकत नाही तसेच एकूण सर्वच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांवर शंका उपस्थित केल्या गेल्या. अश्या वेळी डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी हार न मानता झालेल्या चुकांतून शिकून अग्नी क्षेपणास्त्र यशस्वी करण्याचा विडा त्यांनी उचलला. तब्बल १२-१६ तास आणि आठवड्याच्या शेवटी सुद्धा सुट्टी न घेता अग्नी ला यशस्वी करण्यासाठी त्यांनी मेहनत केली. अग्नी ५ च्या यशस्वी चाचणी नंतर भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवू शकतो ह्यावर जगाने शिक्कामोर्तब केलं. त्यामागे डॉक्टर टेसी थॉमस आणि त्यांच्या टीम चे कित्येक वर्षाचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.
डिफेन्स वैज्ञानिक ते एक गृहिणी, बायको आणि आई अश्या सर्व भूमिकांतून जाताना अनेकदा नक्की कोणाला महत्व द्यावं अशी कसरत डॉक्टर टेसी थॉमस ह्यांना अनेकदा करावी लागली. आपला मुलगा तेजस प्रचंड आजारी असून सुद्धा अग्नी क्षेपणास्त्र ची चाचणी ला त्यांनी जास्त महत्व देताना आपली उपस्थिती तिकडे नोंदवली. २००८ ला इंडिअन वुमन सायंटिस्ट असोसिएशन नी त्यांच्या बद्दल काढलेले गौरवोद्गार बरच काही सांगून जातात.
“We feel Tessy Thomas serves as a role model and an inspiration for women scientists to achieve their dreams and have their feet planted in both worlds successfully”
ह्या वर्षी डॉक्टर टेसी थॉमस ह्यांची नियुक्ती डायरेक्टर जनरल एरोनॉटीकल सिस्टीम डी.आर.डी.ओ. ह्या ठिकाणी झाली आहे. तसेच त्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठाच्या फेलो आहेत ज्यात आय.एन.ए.ई., आय.ई.आय, टी.ए.एस. सारख्या संस्थांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यात लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार २०१२, सर एम. विश्वेस्वरय्या पुरस्कार २०१६, तसेच डी.आर.डी.ओ. पर्फोर्मंस एक्सलंस पुरस्कार २०११, २०१२ ह्यांचा समावेश आहे. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारताची मिसाईल वुमन ( अग्निपुत्री ) अस बोलवण्यात येतं. ज्या क्षेत्रात पुरूषांच वर्चस्व राहिलेलं आहे. त्या क्षेत्रात शिरून पुरुषांच्या बरोबरीने भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमला आकार देणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस ह्या खरे तर भारतीय स्त्रीयांचा आदर्श असायला हव्यात पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. निती आयोगाच्या बैठीकीमध्ये महिंद्रा ग्रुप चे चेअरमन आनंद महिंद्र ह्यांनी एक मार्मिक टिपण्णी डॉक्टर टेसी थॉमस ह्यांच्यावर केली होती.
“Tessy deserves to be more famous than the biggest Bollywood star. A poster of Tessy in every Indian school will wreck stereotypes and create enormous career aspirations for girls”.
डॉक्टर टेसी थॉमस ह्या नेहमीच आपल्या यशाच श्रेय त्यांच्या आईला देतात. लहानपणी पडलेल्या प्रश्नांना शोधण्यासाठी आईने मला संपूर्ण मोकळीक दिली. जेव्हा सर्व जग कॉम्प्यूटर च्या मागे धावत होत तेव्हा मी कुठेतरी एका वेगळ्या क्षेत्रात धडपडत होती. आपली आवड जोपासताना डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी स्त्री शक्ती च एक वेगळ उदाहरण आज भारतातील समस्त स्त्रियांपुढे ठेवलं आहे.
आज भारतातील स्त्री ला त्या दुर्गे सारखच कोणतही क्षेत्र वर्ज्य नाही. अडचणी, प्रतिकूल परिस्थिती सगळीकडे असते पण जो ह्यातून आपला प्रवास सुरु ठेवतो त्याला यश मिळतेच. भारताला क्षेपणास्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण करणाऱ्या ह्या दुर्गेस माझा आजच्या दिवशी नमस्कार आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छ्या.
माहिती स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया, विकिपीडिया
फोटो स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया
दुर्गाशक्ती (भाग २)

आय.ए.एस. ऑफिसर श्वेता अग्रवाल.१९८० च दशक होतं. भारतात अजूनही आधुनिकीकरणाचे वारे पोहचले नव्हते. मुलीच अस्तित्व अजूनही चूल आणि मुल ह्यापुरती मर्यादित होतं. अश्याच एका २८ जणांच्या एकत्रित कुटुंबात श्वेता अग्रवाल चा जन्म भाद्रेश्वर, पश्चिम बंगाल इकडे झाला. जुन्या पिढीतील श्वेताच्या आजी आजोबांची अशी धारणा होती की “घराच नाव हा मुलगाच काढू शकतो. आपला वंश पुढे नेण्याच काम हा फक्त मुलगा करू शकतो. आपल्या घराचा व्यवसाय पुढल्या पिढीत फक्त आणि फक्त मुलगाच नेण्यास सक्षम आहे”. त्यासाठी श्वेता च्या आई वडिलांवर मुलगा होण्यासाठी खूप दबाव टाकला जात होता. त्यामुळे जेव्हा श्वेता चा जन्म झाला तेव्हा कोणीच आनंदी झालं नाही. उलट श्वेता ला जन्म देणाच्या आई वडिलांच्या निर्णयामुळे त्यांना त्या एकत्र कुटुंबात अनेक पद्धतीने दूषणं ऐकावी लागत होती.
श्वेताचे वडील बारावी तर आई दहावी पर्यंत शिकलेली होती. कमी वयात लग्न करणाच्या पद्धतीमुळे आईचं शिक्षण सोडून लग्न लावून देण्यात आलं होतं. जे आपलं झालं ते आपल्या मुलीचं होऊ नये म्हणून लहानपणापासून तिच्या आई वडिलांनी आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं. आपल्या १५ भावंडात श्वेता सगळ्यात लहान होती. पुढे जाऊन आपल्या कुटुंबातील पदवी शिक्षण घेणारी ती पहिली मुलगी ठरली. श्वेताच्या बहिणींची लग्न वयात येताच लावली गेली. पण आपल्या मुलीला शिक्षण द्यायचा बांधलेला चंग तिच्या आई वडिलांनी सोडला नाही. श्वेताच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्याकाळी शाळेची महिन्याची फी १६५ रुपये भरण्याची पण श्वेता च्या आई वडिलांना कठीण जात होतं. श्वेता चे वडील रोजणदारी वर काम करत होते. त्याशिवाय किराणा दुकानातून उत्पन ही बेताच होतं. श्वेताचे वडील अनेकदा तिच्या आईला म्हणत की, “आपण रोज १० रुपये वाचवले तरी तिचं शिक्षण करू शकु”. श्वेता ही नातेवाईकांनकडे गेल्यावर त्यांनी दिलेले अगदी ५ रुपये सुद्धा जपून ठेवत असे. त्यातून शाळेची फी भरण्याचा आपला खारीचा वाटा उचलत असे.
श्वेता ला कळून चुकलं होतं की आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीच फळ आपण अभ्यास करूनच परतफेड करू शकतो. कॉलेज ला जायला लागल्यावर तिच्या काकांनी तिच्या पुढल्या शिक्षणाला विरोध केला. मुलगी कॉलेज करून काय करणार आहे? श्वेता ने तिच्या आई वडिलांना निक्षून सांगितल की आपल्या घराण्यातून पदवी शिक्षण घेणारी मी पहिली मुलगी बनेल. तिचे हे शब्द तिने खरे करून दाखवले. पण श्वेता तिथेच थांबली नाही. सरकारी कार्यालयातील ढिसाळ कामाचा एकदा अनुभव आल्यावर मी ह्या ऑफिस ची ऑफिसर बनवून दाखवेन हे बोल तिने तिथे असलेल्या अधिकाऱ्याला बोलून दाखवले होते. त्यासाठी तिने मिळालेला जॉब सोडला. जॉब सोडताना तिच्या बॉसने तिला सांगितल की “ज्या परीक्षेला ५ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून फक्त ९० लोकं निवडली जातात. त्यासाठी आपलं पूर्ण करियर तू धोक्यात घालते आहेस अस वाटत नाही का तुला? त्यावर श्वेता ने एक सेकंद वेळ न दवडता उत्तर दिल होतं. “त्या ९० मध्ये मी एक असेन”.
२०१३ ला श्वेता ने पूर्ण मेहनत करत यु.पी.एस.सी. ची परीक्षा दिली. त्यात तिचं रँकिंग होतं AIR 497. तिचं आय.पी.एस. व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. पण तिला आय.आर.एस. बनता येणार होतं. ह्या नंतर घरून लग्ना बद्दल बोलणी सुरु झाली. पण श्वेता च्या मनात तीच स्वप्न स्वस्थ बसून देतं नव्हतं. लग्न काय ३२ वर्षानंतर पण होईल पण ३२ वर्षानंतर मी यु.पी.एस.सी. देऊ शकणार नाही हे तिने आपल्या आई वडिलांना निक्षून सांगितलं. पुन्हा एकदा २०१५ ला तिने परीक्षा दिली. अवघ्या १० मार्कांनी तीच स्वप्न भंगलं. तिचं रँकिंग होतं AIR 141. आता ती आय.पी.एस. साठी पात्र ठरली होती. पण अजूनही तीच स्वप्न अपूर्ण होतं. पुन्हा एकदा त्यासाठी तिने २०१६ ला परीक्षा दिली. आय.पी.एस. च तीच ट्रेनिंग सुरु असताना एक दिवस तिचा फोन वाजला. समोरून सांगितल श्वेता AIR 19. हे ऐकताच श्वेता च्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्वेता पश्चिम बंगाल राज्यातून पहिली आणि पहिल्या २० नंबर मध्ये तब्बल दशकानंतर कोणीतरी पश्चिम बंगाल मधून मजल मारली होती. हा आनंदाचा क्षण इतके वर्ष तिच्या आई वडील आणि तिने पाहिलेल्या स्वप्नपुर्तिचा क्षण होता.
अभ्यास करताना श्वेताने दोन वाक्य आपल्या अभ्यासाच्या टेबलवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवली होती. ती होती,
The Alchemist, “When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
Eleanor Roosevelt’s words, “The future belongs to those who believe in the beauty of their dreams.”
श्वेता ने ही वाक्य लक्षात ठेवून आपलं ध्येय मिळवलं होतं. ज्या कुटुंबात मुलगी झाली म्हणून तिच्या आई वडिलांना हिणवलं गेलं. मुलगाच आपल्या कुटुंबाच नाव मोठ करतो हा समज तिने आपल्या कर्तुत्वाने खोडून काढला आणि आपल्या कुटुंबाच्या आणि एकूणच भारतीय स्त्रियांबद्दल असलेला गैरसमज दूर केला. प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि मनापासून इच्छा असेल तर स्काय इज द लिमिट हे तिने भारतीय स्त्रियांना दाखवून दिलं. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर
“They had nourished and nurtured my dream just as strongly. It was a fruit of their hard work too. From now on, no one would ever walk up to my parents, especially my mother and say, ‘Aapne beta nahi kia?’ (Why didn’t you plan a son?) To aspirants, I say, dream big. Don’t forget to back your dreams with hard work and determination.”
अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून आपलं शिक्षण पूर्ण करून स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आणि ती आपल्यासोबत आपल्या कुटुंबाच नाव पण वर नेऊ शते हे श्वेता ने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं आहे. अश्या ह्या दुर्गेस माझा नमस्कार आणि पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छ्या.
माहिती स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया
फोटो स्त्रोत :- बेटर इंडिया
Back to content | Back to main menu