श्री संगमेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Go to content

श्री संगमेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री संगमेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र, करवीर येथील प्राचीन महात्म्य लाभलेले, रविवार पेठ पुलाच्या उजव्या बाजूस जिवंती-गोमती नदीच्या संगम काठावर असणारे मंदिर म्हणजे श्री संगमेश्वर-महादेव मंदिर.

कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालय, उमा टॉकीज सिग्नल वरून पार्वती टॉकीज रस्त्यावरील रविवार पेठ पुलाच्या उजव्या बाजूस हे मंदिर आहे. दक्षिण काशी क्षेत्र नामावलीत असणारे हरिपूर, जिल्हा सांगली येथील श्री संगमेश्वर मंदिर कृष्णा-वारणा नदी संगमापासून बऱ्याच अंतरावर आहे. अगदी त्याच पद्धतीने जिवंती आणि गोमती नदी संगम स्थानापासून थोड्या अंतरावर हे श्री महादेव -संगमेश्वर स्थान आहे. श्री महालक्ष्मीची महती सांगणारे जुने प्राचीन ग्रंथ, पुस्तके यामध्येही येथील स्थान उल्लेख आढळून येतो. करवीर महात्म्य ,दक्षिणकाशी कथासार या ग्रंथातील एकोणतीसाव्या अध्यायामध्ये येथील संगम स्थानाचा उल्लेख दिसून येतो. अगस्ती आणि लोपामुद्रा यांनीही करवीर यात्रानुक्रमानुसार या स्थानी भेट दिल्याचा उल्लेख आढळून येतो. श्रीमंत छत्रपती महाराज सरकार करवीर यांचे सरदार सरज्योतिषी श्री.जोशीराव यांच्या अखत्यारीत हा सारा परिसर होता. सर जोशीराव घराण्याची मुख्य देवता श्री गणेश असून संस्थान कारकीर्दीत त्यांच्याकडे अठरा श्री गणेश-गणपती मंदिर होती. यापैकी प्रमुख मंदिर म्हणजे हे श्री सिद्धिविनायक मंदिर होय. जोशीरावांनी इतिहास कालखंडात या मंदिराची उभारणी केली. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या मानाने दरवाजा खूपच लहान आहे. साधारणतः तीन बाय अडीच फूट एवढ्याच आकाराचा हा दरवाजा आहे. श्री गणेश मूर्ती ही बैठ्या स्वरूपातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या डाव्या हातातील मोदक हाताची बोटे टेकली असल्यामुळे श्रीगणेश प्रत्यक्षात मोदक भक्षण करत असल्यासारखे वाटते. मूर्ती वालुकामय दगडातील असून पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या वर नागफणी असून मूर्ती नयनरम्य वाटते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मंदिरात इतर दोन छोट्या मूर्ती असून बाल गणेशाची एक छोटी मूर्ती तर शेषनाग अशी दुसरी मूर्ती आहे. शहराच्या पूर्वोक्त दक्षिणोत्तर वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे साक्षी सिद्धिविनायक मंदिर आहे.हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला असून मंदिराच्या मुख्य मंडपात जाण्यासाठी पन्नास एक पायऱ्या उतरून जावे लागते. उमा आणि पार्वती टॉकीज च्या दरम्यान कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. मंदिराशेजारून वाहणारी प्राचीन महात्म्य दर्शवणारी जयंती नदी पण याला ओढ्या-वड्या नाल्याचे स्वरूप देत प्राचीन संस्कृतीचा उणेपणा दाखवत ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर अशी नामावली रूढ झाली आहे. खरेतर हा परिसरच अध्यात्मिक महती दर्शवणारा आहे. जयंतीचे पाणी वाढून परिसरात येऊ नये म्हणून जयंती शेजारी भलीमोठी उंच भिंत उभा करून परिसर सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे या सिद्धिविनायक जुन्या दगडी मंदिरापुढे भव्य आर.सी.सी. आकर्षक स्वरूपाचा  मंडप उभारणी केली आहे. या परिसरात असणारे मोठमोठे वृक्ष त्यांना केलेली कट्ट्याची दगडी बांधणी, सर्व परिसरात बसवलेली फरशी, रंगरंगोटी करत आवार स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या मंदिराचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येते. मंदिर परिसरात श्री राधाकृष्ण,हनुमान आणि हे श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे. हे श्री महादेव मंदिर प्राचीन हेमाडपंथी बांधणीतील असून दहा बाय दहा दगडी एकपाकी आहे. मंदिराच्या चौकटीवर सुरेख स्वरूपात श्री गणेश मूर्ती आहे.मंदिर प्रदक्षिणा मार्ग तसेच समोर पत्र्याचे शेड स्वरूपात मंडप उभा करून याचबरोबर दगडी मंदिराभोवती संगमरवरी फरशी, परिसरातही फरशी, रंगरंगोटी, लोखंडी रेलिंग करत परिसर आणि मंदिर स्वच्छ-सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळातील मंदिर समोरील श्री नंदी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे मंदिरासमोरील चबुतऱ्यावर नवीन श्री नंदी मूर्ती उभा केली आहे. यामुळे शेजारील आवारातच  जुनी श्री नंदी ममूर्ती ठेवली आहे.

असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील जयंती-गोमती संगमस्थान जिवंतिशेजारी रविवार पेठ पुलाच्या उजव्या बाजूस असणारे हे श्री संगमेश्वर-महादेव मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.Back to content