श्री गोमतेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Go to content

श्री गोमतेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री गोमतेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले अगस्ति क्रमानुसार दक्षिण मानस यात्रेतील तीर्थ महात्म्य देवता म्हणजे श्री गोमतेश्वर महादेव मंदिर.

हुतात्मा पार्क - बागेतील श्री लिंगेश्वर, मुरलीधर गोपाल कृष्ण मंदिराशेजारी हे मंदिर असून या हुतात्मा पार्क बागेच्या पूर्व बाजूने गोमती नदी वाहत आहे. आज या नदीस ओढ्या - नाल्याचे स्वरूप देऊन नदीचे अस्तित्व नाममात्र उरले आहे, तरी येथे अति प्राचीन, पौराणिक इतिहासाच्या पाऊल खुणा आढळून येतात ही सुद्धा आजच्या काळातील महत्त्वपूर्ण बाबी आहेत. या गोमती नदीचा उगम चित्रनगरीच्या डोंगर-कपारीत होऊन आर. के. नगर परिसर, राजेंद्रनगर झोपडपट्टी बर्ड स्कूल, मनोरा हॉटेल, ॲस्टर आधार हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या मागील बाजूने के. एम. टी. वर्कशॉप समोरून शास्त्रीनगर, वाय. पी. पवार नगर, हुतात्मा पार्क पूर्व बाजूहुन सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस गोमती जयंतीला मिसळते. या संगम स्थानाच्या पूर्वोक्त श्री संगमेश्वर तर पश्चिमेस श्री गोमतेश्वर हे स्थान आहे. दरम्यान या गोमती नदीस भारती विद्यापीठाच्या परिसरातून आलेला प्रवाह आर के नगर परिसरात तर शांतिनिकेतन स्कूल शेजारुन आलेला छोटा प्रवाह एस. एस. सी बोर्ड च्या पुढे मिसळायला दिसतो. तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरातील जुन्या विहिरी- तलाव येथून येणारे प्रवाह अंबाई डिफेन्स परिसरातून गोमतीस मिसळलेले दिसून येतात.

गोमती चे महत्व अनेक प्राचीन ग्रंथातून दिसून येते. करवीर नगरीत सर्व देवदेवता, ऋषीमुनी या प्रमाणे येथे महर्षी गौतम ऋषींचे स्थान ,गोहत्या पापमुक्त क्षेत्र मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम यांनी महायुद्धानंतर आपले शस्त्र ज्या नदीत धुतले ती नदी म्हणजे गोमती नदी असेही मानले जाते. महर्षी गौतम ऋषि स्थान महात्म्य स्मृती यास्तव श्री गोमतेश्वर स्थान इथे दिसून येते. महर्षी गौतम यांना न्याय दर्शनाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांच्या पासून सुरू झालेले न्याय तसेच तर्कशास्त्र यांची परंपरा पुढे चालू राहिल्याचे दिसून येते.त्यांनी विश्लेषणात्मक दर्शनाची मांडणी केली. न्याय दर्शनाचा प्रमुख विषय ज्ञान. विश्लेषणात्मक ज्ञानाचे स्वरूप, साधन आणि प्रामाणिकता यांचा विचार केला जातो. महर्षी गौतम यांच्या विचारानुसार ज्ञान ,बुद्धी आणि उपलब्धी यामध्ये कोणतेही अंतर नसते.याद्वारे कोणत्याही विषयाचे स्वरूप अवगत होते. या अवस्थेलाच  उपलब्धी असे म्हटले जाते.अथः ज्ञान विषय बोधीया विषये उपलब्धी आहे. बोध हे बुद्धी पासूनच संभव आहे आणि बुद्धी पासूनच ज्ञान उपलब्धी ज्ञान संभव आहे.ज्ञान हे स्वविषयक आहे. न्याय हा तर्क याचा पर्यायवाचक शब्द आहे. आपल्या व्यापक अर्थानुसार प्रमाणानुसार विषयाचे विश्लेषण समीक्षा करण्याच्या बौद्धिक प्रक्रियेला न्याय म्हणतात. यावर विश्लेषणात्मक मांडणी ऋषि गौतम यांनी केल्यामुळे त्यांची दर्शन मांडणी म्हणजे विशुद्ध ज्ञानाचे विज्ञान दर्शन मानले जाते. ॠषी गौतमानुसार ज्ञानासाठी चार प्रकारच्या सामग्रीची गरज असते.अनुभव आणि स्मृती असे दोन प्रकारचे ज्ञान असतात. भागवत पुराणांबरोबरच अनेक ग्रंथात गौतम, गोमती बाबत प्राचीन संदर्भ आढळून येतात.

"श्री करवीर यात्रानुक्रम: श्री महालक्ष्मी प्रीत्ये भवतुश्री: "या ग्रंथातही त्र्यलोक्य वंदिते देवी पापं मेहर गोमती ।वाचातकृतःपापं मने साकर्मणातथा ॥ तत्सर्वविलयंयाति गोमती दर्शने नदी॥ वसिष्ठे समानिता मुनींनायत्र गोमती ॥ स्नातोभवती गंगायांतत्रलौयुग ॥" असे संदर्भही आढळून येतात. प्रभू श्री राम, महर्षी गौतम, वशिष्ठ ऋषी यांच्या स्थान महात्म्याने पावन झालेली नदी म्हणजे गोमती नदी आणि या नदीच्या काठी असणारे मंदिर म्हणजे श्री गोमतेश्वर- महादेव मंदिर. मंदिर अतिप्राचीन असल्यामुळे मंदिर पूर्ण जमीनदोस्त होऊन मंदिराचे प्राचीन अवशेष, कोरीव दगड आज पहावयास मिळतात. श्री नंदी मूर्ती तर अर्धवट भग्नावस्थेतच आढळून येते. हुतात्मा पार्क - बागेतील श्री गोपाळकृष्ण मंदिराशेजारी या मंदिराचे कोरीव दगड, खांब अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. अन्य काही समाधी स्मृती शिवपिंडी ही इथे दिसून येतात. श्री गोमतेश्वर शिवपिंडी वरती काही भक्तगणांनी पत्र्याची शेड उभा करत शिवपिंडी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर मानस यात्रेतील मंदिर म्हणजे श्री गोमतेश्वर- महादेव मंदिर.


उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.




Back to content