श्री सोमेश्वर-वडेश्वर

Go to content

श्री सोमेश्वर-वडेश्वर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री सोमेश्वर- वडेश्वर : जुना बुधवार पेठ येथील वीरशैव लिंगायत समाज येथील रुद्रभूमीत असणारे प्राचीन शिवमंदिर म्हणजे श्री सोमेश्वर- वडेश्वर महादेव मंदिर.

जुन्या काळातील श्री वडेश्वर तीर्थाच्या पूर्वेस पाच बाणावर जीतिच्या ओढ्यावर दलित वस्तीच्या उत्तरेस शेतात हे लहानशा स्वरूपात मंदिर होते. मंदिर हेमाडपंथी शैलीतील बाराव्या शतकातील असून दहा बाय दहा दगडी एकपाकी एवढेच मंदिराचे स्वरूप. मंदिराच्या सभोवती दगडी चौथरा,खांबाचा आधार घेत नंदीमंडप उभारणी असे सर्व मिळून पंधरा बाय पंधरा आकारातील जुने मंडप मंदिर. अलीकडील काळात पंचवीस बाय पंचवीस असा आर.सी.सी. स्वरूपातील जोड मंडप उभा करत जुन्या-नव्याचा संगम साधत मंडप प्रशस्त केला आहे. जुन्या काळी समाजातील स्मशानातील महादेव अशीच या मंदिराची ख्याती होती. प्रेतात्मा, भूत, प्रेत, वेताळ या सर्वांचा या ठिकाणी वावर या मुळेच जुन्या ग्रंथात या ठिकाणाविषयी "ज्वाला जिव्ह नामको वेतालः क्षेत्रस्य पंचायतन संज्ञाविधीरूप " असे संदर्भ आढळून येतात. प्रेतात्मां चे ठिकाण पण शेवटीही श्री महादेवांमध्येच विलीन होतात म्हणून या भूमीला रुद्रभूमी असे म्हटले जाते. वीरशैव लिंगायत समाजातील  एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर अंत्यविधी येथे केले जातात.या अंत्यविधी मध्ये पर्यावरण रक्षण ही प्रमुख भुमिका असते.वायू,जल प्रदूषण रोखणे यातून दफन प्रक्रिया याच बरोबर अलीकडील काळात समाजातील एखादी व्यक्ती लिंगैक्य झाल्यानंतर त्याच्यावर रुद्रभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. माती सावरण्याच्या दिवशी पाहुण्यांची गर्दी, दफन केलेली जागा शेणांनी सारवून गोमूत्र शिंपडण्याची रीत व त्या ठिकाणी नैवेद्याचा पडलेला खच हे नेहमीचे चित्र होते. कावळ्याने नैवेद्य शिवल्यानंतर काही नैवेद्य कुत्र्या व मांजरांच्या पोटात जाई. नंतर उर्वरित नैवेद्य कचराकुंडीत टाकून द्यावे लागत असे. यामुळे अन्नाची नासाडी होई शिवाय प्लॅस्टिक कचरा द्रोण, पिशव्यांच्या माध्यमातून होई यामुळे जुन्या रुढी परंपरा बदलत ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे केवळ त्याच्या कुटुंबाने एकच नैवेद्य शक्यतो फक्त दहीभात ठेवण्याची प्रथा सुरू केली आहे. अन्य पाहुणे यांनीही समाजातील जाणकारांचा आदर करत नव्या विचारांचा स्वीकार केला आहे. जुन्या नव्या विचारांचा संगम म्हणून श्री वीरशैव लिंगायत समाजाकडे पहिले जाते. माती, पंचमहाभूतातून मानवी शरीर जीवन मिळते आणि शेवटीही त्यामध्येच मिसळतो.पण हे जीवन जगत असताना लिंग अथवा श्री महादेवाच स्मरण ठेवूनच जगतो याचबरोबर शेवटी लिंगैक्य झाल्यावरही ईश्वरी स्मरण असे एक तत्वज्ञान इथे सामावलेले आहे. अंत्यसंस्कार विधीसाठी या रुद्र भूमीत काही जंगम -स्वामीं कुटुंब निवास करून राहिले आहेत. साहजिकच या श्री वडेश्वर- सोमेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता,दिवाबत्ती,नित्यनियमित  पूजा होते ही एक समाधानाची बाब.

असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री वडेश्वर- सोमेश्वर महादेव मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.

Facebook Link : https://www.facebook.com/udaysinh.rajeyadav.1


Back to content