श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर - शिवाजी पेठ, कोल्हापुर.
Published by उदयसिंह मानसिंगराव राजेयादव in Mythology of Kolhapur · Monday 27 Sep 2021
Tags: Lavnalayeshwar
Tags: Lavnalayeshwar
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर - कोल्हापुरातील शिवाजी पेठ, उभा मारूती चौक जवळील हे महादेव मंदिर म्हणजे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले श्री लवणालयेश्वर महादेव मंदिर.
लवण म्हणजे सुंदर. लवण+आलय = सुंदर भागातील मंदिर म्हणून लवणालय. याचबरोबर लवण म्हणजे धातूवर आम्लाची प्रक्रिया करणे. दुधापासून दही, दह्यापासून ताक आणि ताक- लोणी पासून तूप तयार होते ही प्रक्रिया आपणा सर्वांना माहित आहे. सल्फ्युरिक आम्ल प्रक्रियेतून झिंक सल्फेट प्राप्त होते. यानुसार कोल्हापूर नगरी जवळील हा भाग मीठ फुटलेली जमीन असा असण्याची शक्यता आहे. याच बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून या काळातील प्रगल्भता याचा नेमका उलगडा होत नाही. असे असले तरी प्राचीन ग्रंथ संदर्भानुसार लवण ,लवणालय देव संदर्भ आढळून येतात. शिवाजी पेठेतील लोणार तीर्थ विरजंतीर्थ देव लवणालय देव असे ही संदर्भ आढळून येतात. दक्षिण काशी आणि उत्तर काशी या अनुषंगाने झालेली तुला ही "तत लवणालय तटाके तुलस्यादिवन" असे संदर्भ आढळून येतात.
या तुलेमध्ये दक्षिण काशी क्षेत्र, करवीर हे क्षेत्र यवाधिक काशी किंचित वरचढ असे ठरले होते. येथे असणारे मुग्दलतीर्थ आणि विरजंतीर्थ असे छोटे तळे होते आणि या तळ्याच्या काठी हे श्री महादेव मंदिर होते. हेमाडपंथी प्राचीन मंदिर पंधरा बाय पंधरा दगडी एकपाकी असून छोट्या दगडी कमानीतून आत जावे लागते. या मंदिरासमोर दगडी बांधीव बनावटीचा सात बाय पंधरा आकारातील नंदीमंडप दिसून येतो. या नंदी मंडपात चार बाय तीन अशा छोट्या आकाराच्या दरवाजातून वाकून प्रवेश करावा लागतो असा दरवाजा आहे. या मंडपातील नंदी मूर्ती नंतरच्या काळात उचलून श्री महादेव मंदिर गर्भगृहात ठेवलेली दिसून येते. या मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीतील देवळीत सुंदर श्री गणेश मूर्ती आहे. या मंदिराच्या पाठीमागील बाजूस मोठे वृक्ष असून त्यास बांधीव कट्टा तयार केला आहे. या भागात यादवकालीन ऑइल पेंट ने रंगवलेले विरगळ दिसून येते. येथे काही शिवलिंग समाधी शिल्प दिसून येतात. श्री लवणालयेश्वर महादेव शिवपिंडी ही अतिशय प्राचीन असून पाचएक कड्याहून अधिक कडा या शिवपिंडी आहेत.
या प्राचीन मंदिरासमोर ऐतिहासिक काळातील वीस बाय तीस आकारातील मंडप दिसून येतो. या उभा मारुती चौकानजीक भरगच्च वस्ती आणि या घराच्या पाठीमागील बाजूस या श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर मंदिर, मंडपाच्या रुपाने मोकळी जागा हे ओळखून येत नाही. उभा मारूती चौकाकडून मरगाई गल्ली,खंडोबा तालीम कडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर डॉक्टर राऊत यांच्या दवाखान्याच्या समोरील बाजूस पाच सहा फुटाच्या छोट्या बोळातून या मंदिराकडे जावे लागते. श्री महादेव भक्तगणांकडून श्री महादेव तरुण मंडळ प्रणित साळोखे ग्रुप कडून विविध सण उत्सव विधी साजरे केले जातात. मंदिरासमोरील मंडप म्हणजे शिवाजी पेठेतील व्यक्तींसाठी निवांतपणा चे ठिकाण बनले आहे. मंडपाच्या समोरील बाजू अलीकडील काळात दगडी तटबंदीने बंदिस्त केली असून छोट्या बोळातूनच मंदिर चौकात प्रवेश एवढीच वाट शिल्लक राहिली आहे.
प्राचीन काळी हा भाग म्हणजे विरजंतीर्थ, मुग्दलतीर्थ असा भाग होता. एक छोटे तळे आणि या तळ्याकाठी असणारे श्री महादेव मंदिर अशी स्थिती होती. तिर्थाकाठी असणारे श्री महादेव मंदिर म्हणून या मंदिरात श्री मुदगलेश्वर महादेव मंदिर असे अनेक भक्तजन म्हणतात. प्रत्यक्षात श्री मुग्दलेश्वर हे स्थान श्री नरसिंह मंदिराशेजारी आहे. तसेच श्री महालक्ष्मी मंदिरातील ओवरीतही श्री मुग्दलेश्वर महादेव मंदिर आहे. हे श्री महादेव मंदिर स्थान म्हणजे श्री लवणालयेश्वर महादेव स्थान आहे. असे असले तरी अनेक भक्तगणांकडून मूग्दलेश्वर म्हणूनही हे गणले गेले आहे. प्राचीन कालखंडानंतर ऐतिहासिक कालखंडात हा सारा परिसर श्री रामचंद्र पंत अमात्य बावडेकर संस्थान गगनबावडा यांच्या अखत्यारीत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून ते कार्यरत होते. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर राज्याचे प्रमुख हुकुमतपनाह म्हणून ही त्यांनी काम पाहिले.सर्व राज्याचे बंदोबस्तास फौजा जमा करून राज्य संरक्षण करण्याची चांगली तजवीज त्यांनी राखावी यास्तव त्यांच्याकडे गगनबावडा ही जहागीर चालली. पुढे या जहागिरीचे संस्थानात रूपांतर झाले. त्यांचे निवासस्थान वाडा हा या श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिरा शेजारी होता.सर्व राज्यातील दौलतीचा कारभार करावा व जमाबंदी चे लिहिणे, जमाखर्चाचे लिहिणे, मुतालिक- देशपांडे -देशमुख की ची पत्रे लिहिणे, कारणपरत्वे फौज घेऊन जाऊन राज्य स्थापन करावे अशी महत्वाची स्वराज्यातील जबाबदारी पंत अमात्य बावडेकरांकडे होती. काळाच्या ओघात संस्थाने नष्ट झाली.संस्थानिकांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील निवासस्थानास पसंती दिली. यामुळे या भागातील मंदिराकडे दुर्लक्ष झाले आणि आता तर हा भागच भरगच्च लोकवस्तीचा भाग बनला आहे.यामध्ये हे श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर दडून गेल्या सारखीच स्थिती आहे.
असे हे दक्षिण काशी, क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर.
उदयसिंह मानसिंगराव राजेयादव - कोल्हापूर, औरंगाबाद.
मोबाईल नंबर- ९३७०१०१२९३.