कोल्हापूरचे मूर्ती वैभव - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
Narsinha
कोल्हापूरचे मूर्ती वैभव

दशावतार मालिकेमध्ये नरसिंह हा माझा अत्यंत आवडता अवतार आहे. याचं कारण त्याचं रूप त्याची कथा यामध्ये आहे.  माणूस जे ठरवतो त्याच्या पार जाण्याची शक्ती भगवंतामध्ये असते. मनुष्य जे ठरवतो ते घडू न देण्याची आणि ठरवत नाही ते सहज घडवण्याची ताकद परमेश्वरांमध्ये आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरसिंह अवतार. त्याच्याही पुढे जाऊन आपला जर ठाम विश्वास असेल तर तो कोणत्याही क्षणी प्रचिती देऊ शकतो याचे उत्तम प्रत्यंतर नरसिंह अवतारात पाहायला मिळते .

हिरण्यकश्यपू ने मागितलेल्या वरदानातून रस्ता काढणे निव्वळ अशक्य आहे. ज्यावेळेस आपण असुर वरदान मागतानाची कथा ऐकतो तेव्हा वाटतं याचं मरण निव्वळ अशक्यच आहे. पण ज्या क्षणी प्रल्हादाच्या हाकेस्तव लाकडाच्या खांबामध्ये नरसिंह प्रगट होतात त्या वेळेला लक्षात येते किती सोयीस्कर पणानं देवानं यातून मार्ग काढला. म्हणजे परमेश्वरावर विश्वास असला की अशक्यप्राय गोष्ट सुद्धा सहज शक्य होऊ शकते; याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा अवतार आहे.

पण यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो अवताराचा कारण ठरलेला भक्तराज प्रल्हाद, जो असंख्य घाव सोसून सुद्धा आपल्या मतावर ठाम राहिला सगळी संकट भोगून सुद्धा हरीच्या नावावरची निष्ठा ज्यांनं अखंड ठेवली आणि म्हणूनच या अवताराच्या बिरुदावलीत 'प्रल्हाद वरद शामराज महाराज' असा घोष अखंड पणाने केला जातो.
सरते शेवटी एकच... आपला विश्वास दृढ असेल तर परमेश्वराला सुद्धा  भक्ताच्या हाकेसाठी धावून यावं लागतं. याहीपेक्षा आणखी वेगळं म्हणजे परमेश्वर सगळ्यांसाठी सारखा आहे. पण जितकं प्रेम तो लक्ष्मी वर करत नाही तितकं प्रेम तो त्याच्या शत्रूवर करतो. प्रमाण बघायचं असेल तर लक्ष्मी नरसिंहाच्या मूर्तीमध्ये लक्ष्मी देवाच्या डाव्या मांडीवर असते. पण दैत्य वधाच्या मूर्तीमध्ये मात्र हिरण्यकश्यपू देवाच्या दोन्ही मांडी वरती असतो. आता याला कोणी युद्धाचा पवित्रा म्हणो; पण मला मात्र एक जाणवतं तो जे प्रेम लक्ष्मीवर नाही ते तो दैत्यावर दाखवतो आणि म्हणूनच त्याचा शरीर कोश ओढून त्याला मुक्ती देण्यासाठी  तो त्याला लहान बाळाप्रमाणे मांडीवर घेतो. विक्राळ भासला, क्रूर वाटला, भयानक दिसला तरी भक्तांच्या उद्धारासाठी  नरसिंहासारखं दुसरे रक्षक रूप नाही.
(सोबत छायाचित्र करवीर निवास श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मंदिराच्या उत्तर दरवाजाला असलेल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणात असलेला स्तंभावरचा प्रल्हादाच्या हाकेची आणि त्याच्या आघाताची वाट बघत स्तंभावर विराजमान झाले असा योग  नरसिंह)

श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
कोल्हापूरचे मूर्ती वैभव

कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर हा मूर्ती कलेची समृद्धी सांगणारा आहे. मनोबल आणि शारीरिक शक्तीचे प्रतीक म्हणजे श्री हनुमान. जवळपास प्रत्येक गावात किमान एक, काही गावात तर एका पेक्षा जास्त हनुमानाची मंदिरं पाहायला मिळतात. आपलं कोल्हापूर याबाबतीतही वैशिष्ट्य राखून आहे. श्री हनुमंताची म्हणजेच मारुतीची विविध रूपं कोल्हापूर परिसरात पाहायला मिळतात. त्यातील काही प्रसिद्ध आहेत तर काही अप्रसिद्ध. अशाच काही अप्रसिद्ध पण वैशिष्ट्य पूर्ण मारुती च्या मूर्तीं बद्दलची माहिती इथं देत आहोत. कोल्हापूर मध्ये प्रचलित रूपात उभा मारुती आहे, सोन्या मारुती आहे. त्याच बरोबर कोल्हापूर परिसरामध्ये मारुतीची अनेक विलोभनीय रूप आपल्याला पाहायला मिळतात. मारुतीच्या  या  स्वरूपांचं वर्णन असलेलं हे सदर.

आई अंबाबाईच्या कृपाशीर्वादाने कोल्हापूरची माहिती, महती आणि समृद्धी याची गुंफ शब्दरूपात करून तुमच्या समोर सादर करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. कोल्हापुरातील ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा (संपर्क - ९८९०१४४६१०) यांच्या मार्गदर्शनाने हा संकल्प पूर्णत्वास जात आहे.
मुळात ज्या रामायणातून मारुती प्रकट झाला त्या राम कथेच्या विविध आवृत्ती जगभर आजही प्रचलित आहेत. अगदी भारतात सुद्धा आनंद रामायण, वाल्मिकी रामायण अशा अनेक राम कथा प्रचलित आहेत.

चारित्र्य संपन्न, बुद्धिमान, अफाट सामर्थ्यशाली आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा या गुणांनी मारुतीच व्यक्तिमत्व सजलेलं आहे. कधी रामपंचायतनात रामासमोर गुडघ्यावर नम करीत बसलेला किंवा रामासमोर नमस्कार मुद्रित उभा असलेला, तर कधी राम-लक्ष्मणांना खांद्यावरून घेऊन जाणारा, द्रोणागिरी; एक पर्वतच उचलून आणून लक्ष्मणाला जीवनदान देणारी संजीवनी उपलब्ध करणारा, आपल्या हृदयातील प्रभू रामचंद्राचे स्थान दाखविताना छाती फाडणारा, गदा उगारून राक्षसांच्या सेनेचा संहार करणारा, अतिश्रमामुळे निद्रिस्त अवस्थेतील अशी या मारुतीची विविध प्रकारची शिल्पे पहायला मिळतात.

'चपेटदान मारुती' हे हनुमानाचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये अशोकवनात रामदूत म्हणून सीतामाईची भेट घेतल्यानंतर त्या अशोकवाटिकेचा विध्वंस करणारा हनुमंत दाखविण्यात येतो. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेने हनुमंताने लंकेला भेट देऊन सीतामातेला प्रभुरामचंद्रांचा संदेश दिला. तेव्हा त्याची दूताची भूमिका असल्यामुळे तो निशस्त्र होता. अशोक वाटेच्या आरक्षणासाठी
रावणाने राक्षस स्त्रियांची नेमणूक केली होती. त्यांच्या शस्त्र विरोधाला न जुमानता मारुतीने केवळ शरीर बळावर हे वन उध्वस्त केले. रामायणातील या घटनेचे वर्णन असलेले शिल्पांकन मारुतीच्या चपेटदान मारुती या स्वरूपात पाहायला मिळते.

आपल्या शरीराचा आकार इच्छेप्रमाणे लहान किंवा मोठा करण्याची विद्या मारुतीकडे होती. अशोकवाटिका उध्वस्त करताना त्यांनी आपल्या शरीराचे आकारमान वाढवले होते. त्याच्या हाताच्या फटक्याने मोठे मोठे वृक्ष जमीनदोस्त होत होते. मारुतीचा डावा हात त्याच्या कमरेवर टेकवून ठेवलेला असून त्या हातात उन्मळून काढलेला डेरेदार वृक्ष किंवा झाडाची फांदी धरलेली असते. मारुतीचा उजवा हात थप्पड मारण्याच्या अविर्भावात उगारलेला असतो. शेपटी उजवीकडून वरील बाजूकडे मस्तकावरून डाव्या बाजूला कमरेपर्यंत कमानी सारखी दाखविली जाते. या प्रकारच्या शिल्पाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे मारुतीची उभारलेली शेंडी जी मारुतीच्या क्रोधायमान अवस्थेचे प्रतीक आहे. मूर्तीच्या हातात व दंडावर कडे, गळ्यात अलंकार व पायात तोडे असतात.

आजन्म ब्रह्मचारी असलेल्या मारुतीच्या पायाखाली असलेले स्त्री शिल्प हे त्याचं वेगळेपण आहे. अशोकवाटीकेच्या रक्षणासाठी रावणाने नेमलेल्या राक्षस स्त्रियांनी मारुतीला सशस्त्र प्रतिकार केला. त्याला न जुमानता मारुतीने आपले विध्वंसाचे कार्य सुरूच ठेवले.
या प्रसंगाचे शिल्पांकन म्हणून अशा शिल्पातील मारुतीच्या पाया खालील पराभूत अवस्थेतील सशस्त्र स्त्री दाखवली जाते. यासंदर्भात आणखी एक आख्यायिका अशी आहे की मारुतीच्या पायाखाली स्त्री म्हणजे शनीच्या साडेसातीचे प्रतिक आहे. म्हणून साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी अशा प्रकारच्या मारुतीची उपासना करावी अशी लोकमानसात श्रद्धा आहे. एकंदरीतच रामायणातील अशोकवाटिकेच्या विध्वंस प्रसंगाचे यथार्थ चित्रण असलेल्या मारुतीच्या अशा मूर्ती दुर्मिळ असल्या तरी कोल्हापूर परिसरात मात्र अनेक मूर्ती पाहायला मिळतात. जोतिबा डोंगरावरील मंदिरात, जोतिबाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला एक देवाष्टकात अशी मूर्ती आहे. शिवाय कोल्हापूरच्या पश्चिमेस असलेल्या कसबा बीड या प्राचीन इतिहास असलेल्या गावातील वेशीवरील मारुती अशाच प्रकारचा आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला कसबा बावडा येथील जुन्या मारूती मंदिरातील शिल्पही अशाच प्रकारचे आहे.

एका कवीने मारूतीचे वर्णन करताना त्याला रामप्रियाशरणदास असे म्हटले आहे. आपल्या परमाराध्य दैवताच्या पत्नीची रावणाच्या कैदेतील अशोकवाटीके मधील दयनीय अवस्था पाहून क्रोधायमान मारुतीची स्थिती दाखवणाऱ्या चपेटदान मारुतीची ही शिल्पे अनेक बारकाव्यांनिशी बनवण्यात आली आहेत. यांचा अभ्यास करणं ही मूर्ती शास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे.

आपल्या प्रतिक्रिया आम्हांस इथे कळवा.

             
Back to content